मार्निंग वॉकला गेलेल्या वृध्देची 96 हजाराची मंगलपोत लांबविली

0

जळगाव : शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृध्देची समोरुन पायी चालत येत असलेल्या भामट्याने गळ्यातील 96 हजारांची मंगलपोत तोडून नेल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजता मोहननगरातील वृंदावन गार्डनजवळ घडली. महिलेने आरडाओरडही केली. मात्र तोपर्यंत भामटा पसार झाला होता.
मोहनगर वृंदावन गार्डजवळ प्लॉट नं. 149/5 येथे सुनंदा तुळशिराम महाजन (वय 60) पती सह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती तुळशिराम महाजन हे सेवानिवृत्त आहेत. तर त्यांचा मुलगा दिनेश हा पुणे येथे कार्यरत आहेत. सुनंदा महाजन यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना डॉक्टरांनी दररोज सकाळी मॉर्निक वॉक करण्याचा सल्ला दिला आहे. त्या अनुषंगाने त्या रोज सकाळी घराबाहेर पडून मॉर्निग वॉकला जातात.

पोत ओढून नेल्याने वृध्द खाली कोसळली
दि. 23 रोजी सकाळी आठ वाजता त्या मॉर्निग वॉक करून वृदावंन गार्डनकडून घराकडे चालत असताना समोरून एक अनोळखी येत होता. काही कळण्याच्या आत अचानक त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने ओढुन हिसकाविल्यानंतर तो पळून गेला. गळयाला झटका आल्याने महिलेचा तोल जाऊन त्या खाली रस्त्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. सुमारे 96 हजार किंमतीचे तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे मनीमंगळसुत्र, काळे मणी चोरून नेल्याप्रकरणी आज रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार गोपाल चौधरी हे करीत आहेत.