दोघे संशयित एलसीबीच्या ताब्यात
शिरपूर: मध्यप्रदेश राज्यात बनावट दारू तयार करुन महाराष्ट्र राज्याच्या सीमा परिसरात अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहितीद्वारे एलसीबीच्या पथकाने कारवाई करत 6 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल 16 जून रोजी जप्त करत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे, मध्यप्रदेश राज्याच्या सीमाकडून महाराष्ट्रातील मालकातरकडे महिंद्रा पिकअप गाडी (क्र.एमएच-18एए-2230) येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस पथकाने मालकातर गावातील मंदिराजवळ सापळा लावुन वाहन पावणे बारा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यावेळी वाहनात हजर असलेल्या तीनपैकी एक संशयित पसार झाला. वाहनातील दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता व वाहनाबाबत विचारणा केल्यावर वाहन चालकाने त्याचे नाव मुकेश जगू पावरा तसेच त्याच्या सोबत रमेशचंद्र नारायणप्रसाद शिवहरे (रा. मोयदा, ता.पानसेमल, जि.बडवाणी) असे सांगून पळून गेलेल्या इसमाचे नाव भूर्या राजाभाऊ पावरा (रा.मालकातर) असे सांगून वाहन मालकाचे नाव दिनेश राणा पावरा आहे, असे सांगितले.
याप्रकरणी वाहनचालक मुकेश जगू पावरा (रा.मालकातर), रमेशचंद्र नारायणप्रसाद शिवहरे (रा.मोयदा, ता.पानसेमल, जि.बडवाणी), भुर्या राजा पावरा (रा. मालकातर), दिनेश राणा पावरा (रा.गदडदेव), दारूचे मालक गुरमीतसिंग दिलीपसिंग वाधवा व दिलीपसिंग लालसिंग वाधवा (दोघे रा.मोयदा, ता.पानसेमल, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध सांगवी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, रफीक पठाण, गौतम सपकाळे, नितीन मोहने व राहुल सानप यांनी केली.