मालकातर गावात अडीच लाखाचा बनावट दारुसाठा जप्त

0

शिरपूर। धुळे आणि शिरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत शिरपूर तालुक्यातील एका झोपडीतून अडीच लाखांची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे. गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धुळ्याचे निरीक्षक कावळे तसेच शिरपूरचे निरीक्षक बी. एम. चकोर, अनिल बिडकर दुय्यम निरीक्षक बी. एस.पडजे, एल.एम.धनगर, निकुंभे, हे.काँ.वराडे, प्रशांत बोरसे, राजेश सोनार यांच्या भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरुन तालुक्यातील मालकातर गावाबाहेर असलेल्या एका झोपडीवर छापा टाकला.

या झोपडीमध्ये मध्यप्रदेश बनावटीचे 26 बॉक्स बीयर, 32 बॉक्स विदेशी दारु, 13 बॉक्स देशी दारु आढळून आली. हा माल जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत 2 लाख 41 हजार 320 रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक येत असल्याचे पाहताच झोपडीतील एक इसम पळून गेल्याचे घटनास्थळी चर्चीले जात होते. सध्या धुळे शहरासह जिल्हाभरात अवैध आणि नकली दारुचा साठा केला जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा प्रकारचा दारुसाठा जप्त करण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच दारु बंदी खात्याने आपले नेटवर्क आणखी स्ट्राँग केल्याचे दिसते. त्यामुळेच मालकातर गावातील लाखोंचा दारु साठा त्यांच्या हाती लागला. मालकातर गावाचे सरपंच आणि पोलिस पाटील यांच्या सहकार्याने हा दारुसाठा जप्त करण्यात आल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सांगितले.