जळगाव । दूध फेडरेशन परिसरातील रेल्वेच्या मालधक्क्यावर केबलचे काम करीत असताना वायरमन असलेल्या युवकाला सोमवारी दुपारी 4.20 वाजेच्या सुमारास शॉक लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मनोज बापुराव पाटील (वय 23) असे मयत वायरमन युवकाचे नाव आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मनोज पाटील हा आठ महिन्यांपुर्वी रेल्वेत वायरमन म्हणून नोकरीला लागला होता. त्याचे वडील बापुराव पाटील हे रेल्वेत नोकरीला होते. त्यांनी मुदतपुर्वी निवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागेवर आठ महिन्यांपुर्वी मनोज नोकरीला लागला होता. त्याचा मोठा भाऊ संदीप हा अभियंता असून पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
केबलचे काम होते सुरू
रेल्वेच्या मालधक्क्यावर सोमवारी अभियंता अरविंद कुमार, युवराज दयाराम गिरणारे, योगेश शांताराम पाटील आणि मनोज बापुराव पाटील (वय 23) हे केबलचे काम करीत होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास कॅण्टीन समोर असलेल्या मालधक्क्याच्य शेडमधील हायमास्टचे काम सुरू होते. मेन सप्लाय बंद करण्यात आलेला होता. युवराज गिरणारे हे सुरीने वायर सोलत होते. त्याचवेळी मनोज पाटील याने बाजुला पडलेल्या वायरच्या टोकाला लावलेला कॉटन टेप (चिकटपट्टी) काढत होता. त्याचवेळी रिटर्न करंटमुळे मनोजला जोरदार शॉक लागला. त्याच्या सहाकार्यांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. डॉक्टरांनी मनोज यांची प्राथमिक तपासनी केल्या नंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. यानंतर मनोजचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
वडील नुकतेच भेटून गेले होते
मनोज त्याच्या कुटुंबियांसह शिवाजीनगर परिसरातील रेल्वे कॉर्टरमध्येच राहत होता. सोमवारी मालधक्क्यावर काम सुरू असताना दुपारी 4.15 वाजता त्याचेवडील बापुराव पाटील हे त्या ठिकाणी येऊन गेले. त्यांच्या बोलून झाल्यावर मनोज पुन्हा कामाला लागला. त्या नंतर पाचच मिनिटांनी ही दुर्घटना घडली. त्यामुळे सुरूवातीला वडीलांना या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. मात्र मुलाच्या जाण्याने ते निश:ब्द झालेले होते.
चौकशी केली जाईल
सुरत लाईनजवळील मालधक्का परिसरात केबलचे काम सुरू होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. हि दुर्घटना नेमकी कशामुळे घडली. त्याची योग्य पद्धतीने चौकशी केली जाईल. तसेच रेल्वेकडून मृताच्या कुटुंबियांना सर्व ती मदत दिली जाईल. तर संपूर्ण प्रकाराची माहिती कर्मचार्यांकडून घेण्यात येणार आहे.
– एन. के. अग्रवाल, वरीष्ठ विभागीय इलेक्ट्रीक अभियंता, भुसावळ