मालनगावचे पाणी साक्रीला देण्यास स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध

0

साक्री। तालुक्यातील मालनगाव येथे धरणात असलेले पाणी साक्री शहराला देण्यास स्थानिक शेतकर्यांनी प्रचंड विरोध दर्शविला असून त्यासाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समिती स्थापन करुन लढा देण्याची तयारी चालविली आहे. काल या संघर्ष समितीची धरण परिसरात बैठक होवून त्यात इतरही निर्णय घेण्यात आले. मालनगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी तो पंचक्रोशीतील शेतकर्‍यांसाठी वापरला जावा, अशी शेतकर्‍यांची मागणी असून हे पाणी साक्री शहराला देण्यात येवू नये तसेच त्यासाठी टाकत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या संभाव्य प्रस्तावाला विरोध करण्यात आला. त्यासाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीही स्थापन करण्यात आली आहे.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा
या समितीचे आज धरण परिसरात बैठक होवून त्यात अन्य निर्णय घेण्यात आले. मालनगाव प्रकल्पाखालील कालवा नूतनीकरण करण्यासाठी निधीची मागणी करणे तसेच पाटचार्‍यांचे नूतनीकरण करणे, पाणी नियोजनासाठी पाणीवाटप संस्थांची निर्मिती करणे, धरणातील गाळ काढण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम हाती घेणे आदींबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला प्रभाकर बच्छाव, वसंतराव बच्छाव, भानूदास गांगुर्डे, यशवंत माळी, हिंमतराव बच्छाव, राजेंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, किरवाडेचे दत्तात्रय पाटील, दिगंबर पाटील, टिकाराम बहिरम, एकनाथ गुरव, गोविंदा पाटील, कन्हैय्यालाल माळी, बापू माळी, मनोहर बच्छाव, कुंदन पाटील, साहेबराव पाटील, मुकूंदा पवार, राजेंद्र पाटील, सुक्राम ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.