नवी मुंबई । मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसुलाचा सर्वात महत्त्वाचा करस्त्रोत मानला जात असल्याने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याकडे विशेष लक्ष देत मालमत्ताकर वसुलीबाबत संबंधितांना सक्त सूचना दिल्या आहेत. मालमत्ताकर विभागाचे प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड तसेच सर्व विभाग अधिकारी व मालमत्ताकर वसुली अधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीत आयुक्तांनी मालमत्ताकर वसुलीबाबत सकारात्मक तसेच प्रसंगी मालमत्ता अटकावणी / जप्ती व लिलाव यांसारखी कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. सन 2016-17 मध्ये मालमत्ता कराची वसुली 637 कोटी इतकी झाली असून मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही दिलेले वसुली लक्ष्य पूर्ण करण्यावर सर्वांनी भर द्यावा, असे आयुक्तांनी सूचित केले. यावर्षी सन 2017-18 मध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत 432 कोटी इतकी रक्कम मालमत्ताकरापोटी वसूल झाली असून यापुढील काळात आपले वसुली लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नियमानुसार धडक कारवाई मोहीम हाती घ्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.
कायदेशीर कटू कारवाई टाळावी
मोठ्या प्रमाणावर मालमत्ताकर थकबाकीदारांवर कायदेशीररीत्या अटकावणी / जप्तीची कारवाई करणे, नळजोडणी खंडित करणे अशा विविध प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत असून यामधूनच नागरिकांना दर्जेदार सेवा सुविधा पुरवणे महानगरपालिकेस शक्य होते. त्यामुळे आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी मालमत्ताकर भरणे अत्यंत गरजेचे आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात निवासी तसेच वाणिज्य वापर करणार्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेच्या थकीत मालमत्ताकराचा भरणा लवकरात लवकर आपल्या संबंधित विभाग कार्यालयात अथवा मुख्यालयात किंवा ऑनलाइन महानगरपालिका वेबसाइटवर वा मोबाइल वर करावा, असे सूचित करण्यात येत आहे. या सुविधांचा वापर करून नागरिकांनी आपला मालमत्ताकर भरणा करावा आणि थकबाकीदारांवर होणारी जप्ती अथवा प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी कायदेशीर कटू कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.