मालमत्ता करवसुलीची कोटींची उड्डाणे

0

उल्हासनगर । 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कर वसुलीचा चढता आलेख उल्हासनगरात दिसू लागला आहे. सरासरी 1 कोटी रुपयांची वसुलीची आकडेवारी नोंद होऊ लागली आहे. त्यात काल रात्री उशिरापर्यंत आयोजित केलेल्या जनजागृती रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने डिसेंबर अखेरीस वसुलीचा विक्रम प्रस्थापित होण्याचा विश्‍वास उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगरकरांवर 304 कोटींच्या घरात मालमत्ताकराची थकबाकी आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी भरल्यास विकासकामांना गती मिळणार आहे.

मालमत्ता कर भरण्यास नागरिकांनी केली गर्दी
बिल वेळेवर मिळत नाही अशा तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने बचत गटाच्या महिलांवर प्रथम बिल वाटप करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बिल वाटप झाल्यावर 200 महिलांकरवी बिल भरण्याच्या हाकेसाठी घरोघरी शहरात पाठवण्यात पाठवण्यात आले. ही जनजागृती झाल्यावर 1 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू करण्यात आली. 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी एकत्रित भरल्यास व्याजावर 75 टक्के सूट, 16 ते 30 नोव्हेंबर 50 टक्के सूट, आणि 1 ते 31 डिसेंबर 25 टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली. त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात दिसू लागला आहे. थेट 75 टक्के सूट असल्याने नागरिकांची गर्दी मालमत्ता कर भरण्यास होत आहे.

किन्नरकडून घेतली प्रेरणा
आपल्या लकबीत टाळ्या वाजवून किन्नर व्यापारी, दुकानदार, नागरिक यांच्याकडून पैसे घेतात. अशा सुनीता अनारकली उर्फ दादी या किन्नरकडे सव्वादोन लाखाची थकबाकी होती. त्यांनी अभय योजने अंतर्गत ही रक्कम एकत्रित भरली. ही बाब सर्वत्र व्हायरल झाल्यावर थकबाकीदारांनी यातून प्रेरणा घेतल्याचे चित्र दिसू लागले. मागील चार अभय योजनेपेक्षा ही पाचवी आणि अंतिम अभय योजना कमालीची यशस्वी होत आहे. उपायुक्त दादा पाटील, करनिर्धार व संकलक संतोष जाधव, उपकर निर्धारक जेठा ताराचंद, मनोज गोकलानी आदी त्यासाठी सक्रिय झाली आहे. विक्रमी वसुली डोळ्यासमोर दिसत असल्याचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.