अंबरनाथ । अंबरनाथ नगरपालिकेने गेल्या सुमारे 5 वर्षांपासून आपला मालमत्ता कर ज्या नागरिकांनी कार्यालयात भरला नाही अश्या नागरिकांचा त्यांच्या घरी जाऊन मंगळवारी सत्कार केला. अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक प्रशांत राणे, अर्जुन पाटील, प्रमोद पेडणेकर, अरुण काठवटे, शशिकांत भालेराव, प्रवीण गोसावी यांनी येथील नेताजी मार्केट, बांगडी गल्ली, सिंधी मार्केट, परिसरातील ज्या मालमत्ता धारकानी गेल्या पाच वर्षापासून आपला मालमत्ता कर नगरपालिका कार्यालयात भरलेला नाही,अश्या कर बुडवणार्या नागरिकांच्या घरी किंवा दुकानात जाऊन त्यांचा गुलाबाचे फूल देऊन सत्कार केला. सत्कार स्वीकाणार्या काही घरमालक आणि दुकानदारांनी आपली थकलेली घरपट्टी मार्च अखेरपर्यंत भरणार असे सांगितले. नगरपालिकेचे कर्मचारी वसंत भोईर, सुनील गायकवाड, विवेक पाठारे, भोलानाथ भोईर, आणि सुरक्षा रक्षक चंद्रा मनगट्टी या मोहिमेत सहभागी झाले होते.
कर हे नगरपालिकेचे उत्पन्न
अंबरनाथ शहराच्या विकासासाठी उत्पन्नाचे साधन म्हणजे मालमत्ता कर हे एकमेव साधन आहे, आणि नागरिकांनी आपला कर वेळोवेळी आर्थिक वर्षात भरणे हे आपले कर्तव्य आहे, आजपासून नगरपालिकेने घरपट्टी न भरणार्या नागरिकांना गुलाबफूल देऊन सत्कार करण्याचा उपक्रम राबवण्याची सुरुवात केली आहे. हा उपक्रम अमलात आणणारी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिका ही एकमेव आहे, नागरिकांनी कर भरून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी केेले.