जळगाव: पुणे येथे दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात छापे टाकून पाच संशयितांना अटक करण्यात आली. ट्रकभर पुरावे घेवून पुण्याल्या परतलेल्या आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित तांत्रिक तसेच कागदोपत्री पुराव्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे. यात सुनील झंवर , जितेंद्र कंडारे फरार असून त्यांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान बीएचआरची मालमत्ता खरेदी करणार्यांना गुन्ह्यात चौकशीअंती आरोपी करण्यात येणार असल्याचे संकेत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळाले आहेत.
तपासाअंती दिग्गजांची नावे समोर येतील
पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून संबधित गुन्ह्याच्या तपासात गती देण्यात येत आहे. जळगावला छापे मारल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन गाड्या पुरावे अटक करण्यात आलेल्या विवेक ठाकरे याच्या कार्यालयासह बीएचआरच्या मुख्य कार्यालयातून तसेच फरार असलेल्या सुनील झंवर याच्या कार्यालयातून संकलित करण्यात आले आहेत. संबंधित पुराव्यांचा अत्यंत बारकाईने पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अभ्यास केला जात आहे. या अभ्यासाअंती तपासातून अनेक दिग्गजांची नावे समोर येण्याची शक्यताही सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बीएचआरच्या मालमत्ता विक्री तसेच खरेदी ही प्रक्रिया नियमबाह्य पध्दतीने राबविण्यात आली. याप्रकरणी पुणे येथे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात जितेंद्र कंडारे संशयित आहे. त्यामुळे संशयित कंडारेकडून मालमत्ता खरेदी करणारेही संशयितच या शब्दात आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआरची मालमत्ता नियमबाह्य पध्दतीने खरेदी करणारेही गुन्हेगार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच तपासाअंती त्यांनाही गुन्हयात आरोपी करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे पुढील काळात संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता असून अनेक दिग्गज यात अडकणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.