कल्याण । करबुडव्यांविरोधात महापालिकेची तीव्र मोहीम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आज महापालिकेचे अ प्रभाग अधिकारी सुनील पाटील व त्यांचे पथकाने एनआरसी कंपनीकडे थकित असलेल्या 55 कोटी मालमत्ता करापोटी कंपनीच्या आवारात कचर्याच्या गाड्या खाली केल्या.सुरुवातीला महापालिकेचे सफाई कामगार व वाहनचालक कचरा टाकण्यांस गेले असता स्थानिक नागरिकांनी त्यांना मारहाण केली. तदनंतर प्रभाग अधिकारी सुनील पाटील व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांची समजूत घालून व त्यांचे गैरसमज दूर करून पोलीस बंदोबस्तात कंपनीच्या आवारात कचर्याच्या गाड्या नेण्यात आल्या. मालमत्ता करापोटी ज्या थकबाकीदारांकडे करोडोची थकबाकी आहे. अशांच्या आवारात कचर्याच्या गाड्या रिकाम्या करण्याचे आदेश पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यवाही करण्यात आली.
क प्रभाग अधिकारी यांचे मार्फत पूष्पराज हॉटेल समोरील उस्मान इशाक पटेल व इतर, लाडलीबाई अब्दुल कादीर फक्की व इतर आणि मुमताज बेगम साबिर खान यांचे सुधांशु चेंबर्समधील गाळे अडीच लाखापोटी सील केले. ब प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी बाळाराम भोईर, सिद्धिविनायक गार्डन हॉल, 14.62लक्ष एम.बी. माने, गुरुकृपा फॉरेस्ट कॉलनी, मिलिंदनगर,3.29 लक्ष आणि रोहिदास म्हात्रे 3.19 लक्ष, असे एकूण 21.10 लक्ष थकबाकीपोटी मिळकत सिल केलेल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या या पवित्र्यामुळे थकबाकीदार विशेषत: कंपन्यांमध्ये खळबळ माजली असून, पालिकेच्या संभाव्य कारवाईचा अंदाज घेत करवसुली होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तथापि, पालिकेचा कचरा टाकण्याचा पवित्राही अजब फंडा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.