मालमत्ता लिलावातून ठेवींच्या रकमा परतीचा मार्ग

0

उपनिबंधक विशाल जाधवर ; रावेरला आढावा बैठक

रावेर:- ठेवीदारांना ठेव पावत्यांच्या बदल्यात लिलावात भाग घेता येणार असल्याने मालमत्ता लिलावाच्या विक्रीच्या रकमेतून ठेवीदारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल, असा विश्‍वास जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी येथे व्यक्त करीत यापुढे दरमहा तालुका स्तरावर कॅम्प लावून ठेवी परत करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येतील, असे जाहीर केले.

कठोर कारवाई करा – जाधवर
कर्जदार व संस्थांच्या मालमत्ता जप्तीची व विक्रीची कारवाई व संस्थानिहाय ठेवी वाटपाचा आढावा घेतांना जाधवर यांनी संस्थाचालक, वसुली अधिकारी, प्रशासक, अवसायक व संस्थेच्या अधिकार्‍यांनी दरमहा कठोर कारवाई व शिस्तबद्ध पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या. रावेर तालुक्यातील 300 कर्जप्रकरणांचे 101 चे वसुली दाखले व 194 प्रकरणांत कलम 100 व नियम 85 प्रमाणे कारवाई झाल्याचे व मे 2018 पर्यंत लिलावातून ठेवीदारांना दिलासा देता येईल, अशा उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

यांच्या उपस्थितीत बैठक
जनसंग्राम संघटना प्रणित राज्य ठेवीदार समितीच्या वतीने रावेर तालुक्यातील अडचणीतील तालुकास्तरीय 12 व जिल्हास्तरीय तीन पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवींच्या रकमा परत मिळाव्यात म्हणून संस्थाचालक, अधिकारी व ठेवीदारांची संयुक्त आढावा बैठक जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विशाल जाधवर यांनी घेतली. तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड, जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे हे यावेळी उपस्थित होते.

ठेवीदारांना धनादेशाचे वाटप
सावदा-फैजपूर पतसंस्थेच्या 14 ठेवीदारांना प्रत्येकी 10 हजाराप्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी इतर पतसंस्थांनी सुद्धा तत्काळ कर्जवसुली व स्वःनिधीतून ठेवी परत करण्याचे आवाहन जाधवर यांनी केले.

संस्थाचालकांच्या दारी थाली बजाओ आंदोलन
अडचणीत नसलेल्या पतसंस्थानी जनसंग्राम संघटनेच्या सभासद ठेवीदारांना महिनाभरात किमान 50 टक्के ठेवी परत कराव्यात अन्यथा गावोगावी संचालकांच्या दारी ‘थाली बजाओ आंदोलन’ करण्यात येईल, असा ईशारा विवेक ठाकरे यांनी दिला. दरम्यान, भुसावळ व जळगाव तालुक्याची शुक्रवार, 20 रोजी होणारी आढावा बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती उपस्थित ठेवीदारांना देण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डी.टी.नेटके यांनी केले. बैठकीला ज्ञानदेव महाजन, राजेंद्र साळी, राजेंद्र बोदडे, उज्वला पाटील, अमोल चौधरी, सागर भारंबे, घनःश्याम ढमाळे, प्रदीप भंगाळे या संस्था पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील बहुतांश ठेवीदार उपस्थित होते.