विभागातून 50 ते 100 कोटी मिळण्याची अपेक्षा
पिंपरी (मनिषा थोरात) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरामध्ये लेखी 741 मालमत्ता आहेत. तसेच इतर मालमत्ता दोनशेच्या जवळपास आहेत. मात्र त्या स्थापत्य विभागाकडून भूमिजिंदगीला हस्तांतरित न केल्याने महापालिकेचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. मालमत्तेपोटी महापालिकेला वर्षापोटी साडेसात कोटी रूपये मिळतात. मात्र या विभागातून 50 ते 100 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून आहे. त्यानुसार कामकाज करावे अशा सूचना स्थायी समितीने बुधवारी झालेल्या सभेत दिल्या आहेत.
भूमिजिंदगी विभागाने महापालिकेच्या मालमत्ता हस्तांतरित करून घेण्यासाठी सर्वात प्रथम भाजीमंडई आणि व्यापारी संकुलावर काम करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्यांचे कामकाज सुरु आहे. सध्या महापालिकेच्या यादीमध्ये मनपा कार्यालये 25, व्यापारी संकुले 33, उपहारगृहे 12, सांस्कृतिक केंद्र-समाजमंदिर- मंगल कार्यालये 67, भाजी मंडई-मच्छिमार्केट-मटणमार्केट 24, शाळा इमारत 104, अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने 46, कोंडवाडे 4, स्मशानभूमी 24, क्रीडासंकुले-मैदान-बॅडमिंटन हॅट 37, तालीम व्यायामशाळा 77, उद्याने 133, पाण्याची टाकी-जलशुध्दीकरण केंद्र 41, दवाखाने-रूग्णालये 25, धोबीघाट 4, जकातनाके 24, प्रेक्षागृह 3, जलतरण तलाव 12, इतर इमारती प्रकल्प 18, विरंगुळा केंद्र 10, मैलाशुध्दीकरण केंद्र 14, अग्निशमकेंद्र 4 असे एकूण यादीतील 741 मालमत्ता आहेत. मात्र जवळपास दोनशे मालमत्ता अजून आहेत. मात्र त्या मालमत्तेचे अपूर्ण कागदपत्र किंवा इतर गोष्टीमुळे त्या भूमिजिंदगीच्या यादीत नाहीत. या यादीत नसलेल्या मालमत्तेपोटी महापालिकेचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे.
पालिकेचे मोठे नुकसान
शॉपिंग कॉम्प्लेक्स हस्तांतरित न केल्यामुळे पालिकेचा महसूल बुडतोय. महापालिकेचे व्यापारी संकुल स्थापत्य विभागाकडून भूमिजिंदगीकडे हस्तांतरित न केल्याने महापालिकेचे सर्वात मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वात प्रथम व्यापारी संकुल भूमिजिंदगीकडे घेऊन त्यातून उत्पन्न सुरु करण्यासाठी काम सुरु केले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.