पुणे । महापालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असणार्या सुरक्षारक्षकांच्या सोबतचा करार पुनर्जीवित करण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याने मालमत्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत 842 कामगारांचा करार थांबवण्यासाठीची यादी प्रशासनाने तयार केली असून त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व कामगारांना या प्रकारामुळे मोठा धक्का बसला असून अनेकांनी संसार रस्त्यावर येणार असल्याचे सांगितले.
वर्षाला 32 कोटींचा खर्च
महापालिकेची संपूर्ण शहरात असणारी उद्याने, रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्या, जलकेंद्र अशा विविध ठिकाणी सुमारे 1700 कंत्राटी कामगार काम करतात. साफसफाई, अतिक्रमण कारवाईत मदत, सुरक्षारक्षक अशा विविध भूमिका त्यांच्याद्वारे बजावल्या जातात. यासाठीचा प्रति कामगाराला किमान वेतन म्हणून 7 हजार 200 रुपये अधिक भविष्यनिर्वाह भत्ता देण्यात येतो. वर्षभरासाठी मिळून या कामगारांचा एकूण पगाराची रक्कम 30 ते 32 कोटी रुपयांच्या दरम्यान जाते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी केवळ 14 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे दिलेल्या खर्चात गणित बसवण्यासाठी 842 कामगारांना घरी बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कामगार युनियनचे आयुक्तांना पत्र
महापालिका कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष आणि सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी याबाबत आयुक्त कुणालकुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये बेकादेशीररित्या सुरक्षारक्षकांना कामावरून काढणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. याबाबत भाजपच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून अधिक तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.