मालमत्तेपेक्षा डीएसकेंवर कर्जच जास्त!

0

पुणे : विविध बांधकाम प्रकल्पांसाठी डीएसके उद्योग समूहाने सर्वसामान्य नागरिक व बँकांकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती. त्यासाठी बांधकाम प्रकल्प तारण ठेवण्यात आले होते. परंतु, ठेवी परत करण्यात अपयश आल्याने ठेवीदारांनी दीपक सखाराम कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल होताच बँकांनी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यात सुरुवात केली आहे. ही मालमत्ता हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आर्थिक गुन्हे शाखेपुढे असून, डीएसके सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2015-16च्या विवरणपत्रानुसार डीएसके समूहाची एकूण मालमत्ता 2228.53 कोटींची असून, त्यांना एकूण देणी ही 5400 कोटी रुपयांची आहे. म्हणजेच, मालमत्तेपेक्षा देणी द्यावयाची रक्कम ही अधिक आहे. अशा परिस्थितीत बँकांचेच 2500 कोटी रुपये कर्ज व व्याजापोटी द्यावयाचे असून, बँकांनी मालमत्ता ताब्यात घेतल्याने ठेवीदारांचे पैसे द्यावयाचे कोठून? हा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. ठेवीदारांनी संयम बाळगत डीएसकेंना मार्च 2018 पर्यंत वेळ दिला असता तर ते ठेवीदारांना त्यांची रक्कम परत करू शकले असते. परंतु, ठेवीदार पोलिसांत गेल्याने ठेवी परत मिळविणे हे तपास यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

डीएसकेंच्या बहुतांश मालमत्ता बँकांकडे तारण
पुणेस्थित डी. एस. कुलकर्णी उद्योग समूह आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेला आहे. बँका, आर्थिक संस्था यांच्याकडून घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज हा समूह फेडू शकणार नाही, अशी स्थिती कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर निर्माण झालेली आहे. सद्या डीएसके उद्योगसमूहाकडे असलेल्या मालमत्तेपेक्षा त्यांच्यावरील कर्जाची रक्कम ही जास्त दिसत आहे. ढोबळमानाने हाती आलेल्या माहितीनुसार, डीएसकेंवर पाच हजार 400 कोटींचे कर्ज असून, या उद्योग समूहाची बँकांकडे तारण असलेली मालमत्ता ही जवळपास हजार कोटींच्या घरात आहे. वर्ष 2015-16च्या बॅलन्स शीटमध्ये डीएसकेंनी त्यांची एकूण मालमत्ता ही दोन हजार 228.53 कोटी इतकी दाखविली होती. या मालमत्तेवर त्यांनी विविध बँका व आर्थिक संस्थांसह सामान्य नागरिकांकडूनही कर्जापोटी मोठी रक्कम घेतलेली आहे. जवळपास 27 बँकांकडून त्यांनी 1498 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, आदित्य बिर्ला फायनन्स, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनन्स, बजाज फायनन्स आणि सिंडिकेट बँक यांचाही समावेश आहे. सर्व मिळून एकूण अडिच हजार कोटींचे कर्ज डीएसके उद्योग समूहावर असल्याचे सांगण्यात आले. तसेच, सामान्य नागरिकांतून 1000 कोटींच्या ठेवी घेतल्या गेल्या असाव्यात, असेही सांगण्यात आले. त्यामुळे मालमत्ता कमी व कर्ज जास्त असल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणासमोर असल्याचे या हाती आलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.

डीएसके उद्योगसमूहाच्या संस्थांवरील कर्ज
1) डीएस कुलकर्णी डेव्हलपर्स लि. 1498 कोटी
2) डीएसके मोटर्स प्रा. लि. 503 कोटी
3) डीएसके ग्लोबल एज्युकेशन रिसर्च 245 कोटी
4) होली लॅण्ड अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री 116 कोटी
5) ग्रीन गोल्ड फार्म्स अ‍ॅण्ड फॉरेस्ट 4.40 कोटी
6) डीएसके डिजिटल टेक्नॉलॉजी 30 कोटी
7) डीएसके साउथर्न प्रोजेक्टस 30 कोटी
8) डीएसके स्टुडिओ 10 कोटी
9) चंद्रदीप प्रमोटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स 10 कोटी
10) वास्तू विशारद प्रमोटर्स, डेव्हलपर्स 4.40 कोटी
11) डीएसके मोटोट्रर्क्स 4.40 कोटी
12) डीएसके मोटो व्हील्स 25 कोटी