मालवाहतूकदारांचा आज देशव्यापी संप

0

नवी दिल्ली-पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणावे, इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्चित करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी आज देशभरातील मालवाहतूकदारांनी संप पुकारला आहे. या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार असल्याने राज्यातील स्कूल बस व व्हॅन बंद राहणार आहेत.

इंधनाच्या दरात होणारी वाढ, टोलदरातून सवलत, रस्त्यांवर सरकारी यंत्रणाकडून होणारी लूट बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस शुक्रवारी देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. शुक्रवारपासून देशभरातील मालवाहतूकदार या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यातील १२ लाख ट्रक आणि टेम्पो या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

खासगी वाहतूकदारांच्या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार असून त्यामुळे राज्यासह मुंबई आणि परिसरातील विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने बंद राहणार आहेत.