मालवाहतूकदारांचा मध्यरात्रीपासून देशव्यापी संप

0

मुंबई : विमा कंपन्यांनी थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये केलेली 40 टक्के वाढ मागे घेण्यात यावी तसेच पथकर नाके हटवण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी वाहतूकदारांनी शनिवारी मध्यरात्रीपासून देशव्यापी संप पुकारला आहे. ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने हा संप पुकारला आहे. त्यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 60 लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर धावणार नाहीत.

हैदराबाद येथे 3 एप्रिलला आयआरडीएसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत इन्शुरन्सची वाढलेली रक्कम कमी करण्यासंबंधी कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे ‘ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने शनिवारी मध्यरात्रीपासून देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या देशव्यापी संपात ‘नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन’नेही सहभाग घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 15 हजारांहून अधिक वाहनांनी चक्काजाम केल्यामुळे ही वाहने रस्त्यावर धावताना दिसणार नाहीत. संपाबाबत वेळीच तोडगा न निघाल्यास नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.