मालवाहू वाहनाच्या धडकेत तरुणास अपंगत्व : आरोपी चालकास सहा महिने शिक्षा
यावल न्यायालयाचा निकाल : संशयीतास साडेआठ हजाराच्या दंडाचीही शिक्षा
यावल : तालुक्यातील डांभूर्णी-किनगाव रस्त्यावर जून 2017 मध्ये अपघात झाला होता. रस्त्याच्या कडेला 30 वर्षीय तरुण उभा असताना त्यास मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिल्याने तरुणाला अपंगत्व आले. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून यावल न्यायालयात कामकाज चालले. यावल न्यायालयाने शुक्रवारी या गुन्ह्यात वाहन चालकास विविध कलमांन्वये दोषी ठरवत त्यास एकूण सहा महिने साधी कैद व साडेआठ हजाराचा दंड सुनावला.
भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण झाला जखमी
5 जून 2017 रोजी बाळू शांताराम कोळी (30, रा.डांभूर्णी) हा डांभुर्णी येथे घरी जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करीत किनगाव-डांभूर्णी रस्त्यावर उभा होता. यावेळी किनगावकडून डांभूर्णी जाणार्या मालवाहू पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.48 टी.628त्र या वाहनाने तरुणास जबर धडक दिली. या अपघातात कोळी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमी बाळु कोळी यास मुंबई येथे उपचार्थ हलवण्यात आल. या अपघातात त्यांच्या पाठीचा कणा मोडला गेला व त्यास कायम अपंगत्व आल. अपघात प्रकरणी यावल पोलिसात 29 जुलै 2017 रोजी विजय गोपाल सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार वाहन चालक सुरेश भास्कर कोळी (डांभूर्णी) यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा सखोल तपास हवालदार सुनील तायडे, संजय तायडे, विकास सोनवणे यांनी करीत यावल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावल न्यायालयात सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी या अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादीसह सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली व न्यायालयासमोर हा अपघात सिद्ध केला. यावलचे प्रथमवर्ग न्या.एम.एच.बनचरे यांनी अपघातातील आरोपी सुरेश भास्कर कोळी (रा. डांभूर्णी) यास विविध कलमान्वये सहा महिने साधी कैद व जखमीस नुकसान भरपाई म्हणून पाच हजार व इतर कलमास दंड मिळून एकूण साडे आठ हजारांचा दंड सुनावला.