मालिका विजयासह मिसबाह, युनिस यांचा अलविदा

0

रोसेयू । विंडीजमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने तिसर्‍या व अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात सहा चेंडू शिल्लक असताना विंडीजविरुद्ध रोमांचक विजय मिळवत वेस्ट इंडिजमध्ये पाकिस्तानने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या शानदार विजयासह निवृत्ती जाहीर करणारे दिग्गज फलंदाज मिसबाह-उल-हक व युनिस खान यांना निरोप दिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात 101 धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने मालिका 2-1 अशी खिशात टाकली आणि आपल्या दोन अनुभवी खेळाडूंना गोड निरोप दिला.

केवळ सहा चेंडू बाकी असताना विजय
कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ विजय मिळवण्यासाठी 304 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करीत होता. पण पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहने वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद करीत त्यांचे कंबरडे मोडले, यासिरला हसन अलीने तीन बळी मिळवत चांगली साथ दिली. या दोघांच्या गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने नाबाद 101 धावांची खेळी साकारून पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार केला, पण त्याला दुसर्‍या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही आणि त्यामुळे वेस्ट इंडिजला सामना गमवावा लागला. विंडीजने 1 बाद 7 धावसंख्येवरुन पाचव्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. विजयासाठी 304 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव 96 षटकांत 202 धावांवर आटोपला. शतकवीर रोल्टन चेस वगळता विंडीजचा एकही फलंदाज फिरकीपटू यासीर शाहच्या माऱयासमोर टिकाव धरु शकला नाही. चेसने एका बाजुने किल्ला लढवताना 239 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह नाबाद 101 धावा फटकावल्या. पण, त्याला इतर फलंदाजाची यथोचित साथ मिळू शकली नाही. हेतमार (25), शेई होप (17), कर्णधार जेसॉन होल्डर (22) धावांचे योगदान दिले. बहरात असलेल्या क्रेग ब्रेथवेट (6), केरॉन पॉवेल (4), विशुल सिंग (2) हे सपशेल अपयशी ठरले. सामना संपण्यास अवघे सहा चेंडू बाकी असताना गॅब्रियलला यासीरने बाद करत पाकच्या पहिल्यावाहिल्या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. पाकतर्फे यासीर शाहने 92 धावांत 5 तर हसन अलीने 33 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात दमदार कामगिरी करणार्‍या चेसला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर मालिकेत भेदक आणि अचूक गोलंदाजी करणार्‍या यासिरला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.