नवी दिल्ली । श्रीलंकेच्या गोलंदाजांना तिसर्या कसोटीत अखेर सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात अखेर यश आलेले असून लंकेच्या गोलंदाजांनी दिवसाअखेरीस भारताचे 6 गडी माघारी धाडले आहेत. भारतीय डावाची चांगली सुरुवात झाल्यानंतर मलिंदा पुष्पकुमाराने लोकेश राहुलला माघारी धाडले. त्यानंतर ठराविक अंतराने शतकवीर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराला लागोपाठ माघारी धाडण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आले.
धवनची शतकी खेळी
भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने आपला फॉर्म कायम राखताना श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीसोबतच शिखर धवने विक्रमांना गवसणी घातली. धवनने पहिल्या डावात 17 चौकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील शिखर धवनने आज आपले सहावे शतक झळकावले. शिखरने सहा शतकापैकी पाच शतके ही परदेशी खेळपट्ट्यांवर झळकावली आहेत. भारतीय संघाकडून अशी किमया साधणारा शिखर हा पहिलाच सलामीचा डावखुरा फलंदाज ठरला.
सुरवात जबरदस्त करणार्या भारताची शेवटी पडझड
शिखर धवन 119 धावा काढून दिनेश चंडीमलच्या हाती झेल देत माघारी परतला. पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही अवघ्या 8 धावांवर झेलबाद झाला. कर्णधार विराट कोहलीने यानंतर अजिंक्य रहाणेच्या सोबतीने 35 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पाचव्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विनसोबत पुन्हा एकदा 32 धावांची भागीदारी केली. पण कोहली माघारी संदकनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये करुणरत्नेच्या हाती झेल देत परतला. यानंतर रविचंद्रन अश्विनने वृद्धीमान साहाच्या मदतीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या विकेटसाठी साहा आणि अश्विनने 26 धावांची छोटी भागीदारीही रचली. पण दिवसाचा खेळ संपाण्यास 3 षटके बाकी शिल्लक असताना विश्वा फर्नांडोने अश्विनला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे पहिल्या दिवसाअखेरीस भारताची अवस्था ही 329/6 अशी झालेली आहे.
राहुलकडून दिग्गजांचा विक्रम मोडीत
श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात के. एल. राहुलने शानदार अर्धशतक झळकावलं. हे त्याचं कसोटीतील सलग सातवे अर्धशतक ठरले. त्याने या अर्धशतकासोबतच दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहेत. भारताकडून सलग 7 अर्धशतके ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे. गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी सहा सलग अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. केएल राहुलने दोघांचाही विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत केएल राहुलने अँडी फ्लॉवर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा आणि ख्रिस रोजर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या सर्वांनी सलग 7 वेळा अर्धशतक ठोकलं आहे.