नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेआधीच भारतीय संघाला झटका बसला आहे. सलामीचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळणार नाही. पत्नि आयेशाच्या आजारपणामुळे स्वत: शिखर धवनने संघातून रजा देण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. राष्ट्रीय निवड समितीनेही शिखरची विनंती मान्य केली आहे. शिखरला मोकळे करताना बीसीसीआयने त्याच्या जागी दुसर्या खेळाडूची निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांमधील पहिला सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
धवन चांगल्या फॉर्ममध्ये
याआधी शिखर धवन आपल्या आजारी आईची देखभाल करण्याकरिता श्रीलंकेचा दौरा संपण्याआधीच भारतात परतला होता. धवनने लंका दौर्यातील एकमेव टी 20 सामन्यात सहभाग घेतला नव्हता. याशिवाय लंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातही तो नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून शिखर धवन चांगल्या फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून त्यानेच सर्वात जास्त 358 धावा केल्या होत्या. याशिवाय पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 132 धावांची खेळी केली होती.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, अक्शर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.