नवी दिल्ली । भारत-पाक यांच्यातील क्रिकेट संबंधावारून सध्या वातावरण तापले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत सरकारकडून या मालिकेसाठी रेड सिग्नल मिळाल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची देखील अग्रज नसल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले आहे. भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अधिकार्यांना पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) अधिकार्यांची भेट घेवून चर्चा करण्याची काही गरज नाही, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केले आहे.
भारत-पाक यांच्यातील क्रिकेट संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भारतीय शासनाच्या परवानगीची जरूरी असते. भारतीय शासनाकडून उभय देशातील क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली नसताना पीसीबीने पुन्हा या विषयावर चर्चेचे गुर्हाळ मांडण्याचा हेतू समजत नाही, असेही क्रीडा मंत्र्यांनी येथे म्हटले आहे. भारत-पाक सरहद्दीवरील दहशतवादी कारवाया पूर्णपणे थांबल्या जात नाहीत तोपर्यंत उभय देशातील क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यास भारतीय शासनाकडून विचार केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण विजय गोयल यांनी दिले आहे. दुबईत भारतीय क्रिकेट मंडळ आणि पाक क्रिकेट मंडळाच्या अधिकार्यांच्या बैठकीच्या चर्चेला त्यांनी उत्तर देताना हा खुलासा केला. दोन्ही क्रिकेट मंडळाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीतून काहीच निष्पन होणार नाही, तसेच नजिकच्या काळात भारतीय शासनाकडून या प्रस्तावाला होकार दिला जाणार नाही, असेही गोयल यांनी सांगितले. 2015 ते 2023 या कालावधीत स्पर्धा वेळापत्रकानुसार उभय देशात पाच द्विपक्षीय क्रिकेट मालिका भरविण्याची योजना असल्यानेही पीसीबीला सुमारे 387 कोटी रूपयांच्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे आर्थिक नुकसान वसूल करण्यासाठी पीसीबीने अलिकडेच भारतीय क्रिकेट मंडळाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.