मालेगाव : शहरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात आत्तापर्यंत ३६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मालेगाव शहरात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश मालेगावच्या उपविभागीय दंडाधिकार्यांनी काढले आहेत. या आदेशानुसार, १५ एप्रिल सकाळी ७ वाजल्यापासून ३० एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. त्याचबरोबर १५ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत पाच दिवस बँकाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
करोना हॉटस्पॉट पूर्णपणे सील
शहरातील जे भाग महापालिकेने करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत त्यातील प्रतिबंधित क्षेत्र पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. तसेच बाहेरच्या बफर झोनमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मालेगाव पूर्व आणि बाकी मालेगावशी बाहेरचा संपर्क तोडण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी नियंत्रित क्षेत्र म्हणून प्रतिबंधीत केलेले भाग सोडून उर्वरित भागांतील मेडिकल्स, रुग्णालये, दूध व चारा पुरवठा करणारे विक्रेते, घरगुती गॅसचा पुरवठा करणार्या गॅस एजन्सी या सेवांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मालेगाव शहराच्या हद्दीपासून २ किमी परिघातील सर्व पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. मात्र शहरातील पोलीस दक्षता पेट्रोल पंप (रावळगांव नाका), मुत्तलिक पेट्रोल पंप (दरेगाव), उदयनराज ऑटोमोबाईल पेट्रोल पंप (मालेगाव कॅम्प) हे तीन पेट्रोल पंप सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेतच सुरु राहतील.