मालेगाव । आजवर कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळण्याची पार्श्वभूमी असलेल्या मालेगाव महापालिकेच्या यंदाच्या 24 मे रोजी होणार्या निवडणुकीतदेखील तशीच चिन्हे दिसत असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी काँग्रेस परस्परांवर अक्षरश: तुटून पडले आहे. मुस्लीमबहुल पूर्व भागात काँगेस, राष्ट्रवादी, जनता दल, एमआयएम या पक्षांचे प्रामुख्याने प्राबल्य आहे. पश्चिम हिंदूबहुल भागात शिवसेना व भाजप या दोन पक्षांचे वर्चस्व आहे. 84 पैकी 64 जागा मुस्लीमबहुल भागात आणि वीस जागा हिंदूबहुल भागात आहेत. पूर्व भागात कोणत्या पक्षाला किती यश मिळते यावर सत्ता समीकरण अवलंबून असते. गेल्यावेळी काँग्रेसने मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या ‘तिसरा महाज’च्या मदतीने सत्ता प्राप्त केली होती. पुढे राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले मौलाना यांनी एमआयएम व शिवसेनेची मोट बांधत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली.
मौलानांसाठी एकबाल यांना मदत
या युतीची सत्ता आल्यास दिवंगत जनता दल नेते निहाल अहमद यांचे पुत्र बुलंद एकबाल यांना महापौरपद देणे व जनता दलाने मौलाना मुफ्ती यांना विधानसभा निवडणुकीत साथ द्यावी, असा या दोन पक्षांमध्ये समझोता झाल्याची चर्चा आहे. मालेगावात मुस्लिमांमध्ये दखनी व मोमीन असे दोन समुदाय असून मोमीन समुदायाचे साठ तर दखनी समुदायाचे चाळीस टक्के लोकसंख्येचे प्रमाण आहे. मौलाना व बुलंद हे दोन्ही मोमीन समाजाशी संबंधित तर काँग्रेसचे आसिफ शेख हे दखनी समुदायाशी संबंधित आहेत. त्यामुळे हे ‘सोशल इंजिनियिरग’ हेही कारण या युतीमागे असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व जनता दलाचे 32 उमेदवार दुसर्या क्रमांकावर होते. मधल्या काळात दोन ठिकाणी पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी झाली असली तरी राष्ट्रवादी व जनता दलामधील मतविभागणी टळली असती तर चित्र वेगळे राहिले असते असा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी व जनता दल युतीने भ्रष्टाचाराचे आरोप करून काँग्रेसला ‘लक्ष्य’ केले आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या सत्तेत काँग्रेससोबत राष्ट्रवादीची मंडळी भागीदार होती हे विसरता येणार नाही. त्यामुळे हे आरोप-प्रत्यारोप सोयीचे राजकारण असल्याचे समजून जनताही त्याकडे केवळ करमणूक म्हणून बघत आहे. एमआयएमच्या कामगिरीकडेही सर्वाची नजर आहे. उपमहापौर युनूस इसा याची पालिकेच्या राजकारणात किमयागार म्हणून ओळख आहे.
सत्तांतराची काँग्रेसची धडपड
महापालिका निवडणुकीवर आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे अवलंबून असल्याने महापालिकेची सत्ता टिकविणे ही राष्ट्रवादीची तर सत्तांतर घडवून आणणे ही काँग्रेसची गरज आहे. काँग्रेस आमदार आसिफ शेख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणुकीकडे बघितले जात आहे. राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती केली आहे. वरकरणी राजकीय पीछेहाट झालेला जनता दल व राष्ट्रवादीची गरज म्हणून हा दोस्ताना झालेला असला तरी त्याला अनेक पदर आहेत