मालेगावात पावणेदोन लाखांचे चरस जप्त : तिघे आरोपी जाळ्यात

आयजींच्या विशेष पथकाची गोपनीय माहितीवरून विशेष कामगिरी

मालेगाव : मालेगाव शहरात काही संशयीत प्रतिबंधीत अंमली पदार्थ चरसच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने बुधवार, 20 रोजी नॅशनल पेट्रोलपंपाजवळ छापा टाकून तिघा संशयीतांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 44 हजार 300 रुपये किंमतीची 481 ग्रॅम चरस (अंमली पदार्थ) व 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी तसेच पाचशे रुपये किंमतीचा मोबाईल मिळून एक लाख 74 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या विशेष पथकाला मालेगाव शहरात काही संशयीत चरस विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. रमजानपुरा पोलीस ठाणे हद्दीतील जुना आग्रा रोडलगतच्या नॅशनल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी (एम.एच.41 एफ.9346) वर तीन संशयीत येताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीत मोहंमद सईद फारुख कुरेशी (53, अख्तराबाद, मालेगाव), रफिक मोहंमद याकूब (32, कुंभारवाडा, मालेगाव) व मोहंमद अमीन समिउल्ला अन्सारी (40, अख्तराबाद, मालेगाव) यांना केल्यानंतर त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे 481 ग्रॅम चरस आढळल्याने आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आयजींच्या विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, नाईक नितीन सपकाळे, नाईक मंडले, चालक नारायण लोहरे तसेच आयशा नगरचे निरीक्षक थोरात आदींच्या पथकाने करण्यात आली.