मालेगाव-मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळे येथे जमावाने पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मालेगावमध्येही असाच प्रकार घडला आहे. मालेगावमध्ये जमावाने चौघांना मारहाण केली असून आझाद नगर परिसरात ही घटना घडली आहे. चौघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मालेगावमधील आझादनगर परिसरात मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून जमावाने चौघांना एका खोलीत कोंडून मारहाण केली. संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून देशातील विविध भागांमध्ये जमावाकडून हत्यासत्र सुरुच असून रविवारी धुळ्यातील राईनपाडा येथे जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला होता.