भुसावळ/एरंडोल : पिस्टलाचा धाक दाखवत चाकूने हल्ला करीत माळपिंप्रीच्या सराफावर दरोडा टाकून सुमारे नऊ लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना चोरटक्की गावाजवळ बुधवार, 16 रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात सराफा व्यावसायीक राजेंद्र विसपुते हे जखमी झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एरंडोल पोलिसांनी चौघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिस चौकशीनंतर आरोपींच्या ताब्यातून दोन किलो चांदीसह 20 ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेला एक चाकू जप्त करण्यात आला. दरम्यान, या लुटीतील एक संशयीत एक संशयीत आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे अद्याप पसार असून या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांनादेखील अटक होण्याची शक्यता आहे.
दरोड्याप्रकरणी चौघांना अटक
माळपिंप्री येथील सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते हे रवंजे गावातून दुकान बंद केल्यानंतर गावाकडे परतत असताना त्यांच्यावर 16 रोजी दुपारी प्राणघातक हल्ला करीत 52 हजारांच्या, 150 ग्रॅम सोन्याचे दागिने व चार किलो चांदी मिळून आठ लाख 87 हजार रुपयांचा ऐवज होता. लुटारूंनी सराफाची दुचाकीही या घटनेत लांबवत त्यांची दुचाकी सोडून पोबारा केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (23, रा.भोकर, जि.जळगाव), विशाल अरुण सपकाळे (21, कोळीपेठ, विठ्ठल मंदिराजवळ, जळगाव), विशाल लालचंद हरदे (26, चौगुले प्लॉट, जळगाव) व संदीप राजू कोळी (21, कुरंगी, ता.पाचोरा, ह.मु.कुसुंबा, ता.जळगाव) या चौघांना अटक करण्यात आली होती. आरोपींना 18 रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची (23 फेब्रुवारीपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी तसेच चाकू व दोन किलो चांदीसह 20 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील मास्टर माईंट आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे (कोळीपेठ, जळगाव) याचा कसून शोध सुरू असून या गुन्ह्यात एक ते दोन आरोपी वाढण्याची शक्यता पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी वर्तवली.