पुणे : तीन वर्षापुर्वी घडलेला तो प्रसंग नुसता आठवला तरी माळीणवासीयांच्या अंगाचा आजही थरकाप उडतो. कारण 30 जुलै 2014 रोजी पहाटे दरड कोसळल्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातीहल आख्खे माळीण गाव मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला होता. नुकतेच पुनर्वसन केलेले गावकरी नव्या घरात राहण्यासाठी गेले. परंतू संकट काही केल्या माळीणकरांची पाठ सोडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. कारण पहिल्याच पावसात येथील घरांना तडे गेले आहेत. यामुळे येथील नागरिक पुन्हा संकटाच्या सावटखाली वावरत असून चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने केलेल्या पुनर्वसनाचे पितळ पहिल्याच पावसाने उघडे पाडले आहे.
महिनाभरापुर्वीच झाले होते उद्घाटन
30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील हे गाव पूर्णपणे मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर माळीणचे पुनर्वसन राज्य शासनाकडून करण्यात आले. नवीन माळीण गाव साकारण्यात आले. नवीन घरे, नवीन शाळा बांधण्यात आली. सुमारे महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुनवर्सन केलेल्या नवीन माळीण गावाचे उद्घाटनही करण्यात आले. परंतु पहिल्याच पावसात पुनर्वसन केलेल्या माळीण घावातील घरे, रस्ते यांना तडे गेले आहेत. रस्ते खचले आहेत. यामुळे गावकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहेत.
पुन्हा स्थलांतराचा विचार
माळीण गावाचा नकाशा बदलून महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हस्थांतर सोहळा पार पाडण्यात आला होता. घटनेच्या दोन वर्षांनंतर सरकारने गाजावाजा करत स्मार्ट व्हीलेज म्हणून माळीण गावाचे उद्घाटन झाले. मात्र उद्घाटनानंतर महीनाभरातच नविन माळीणची बिकट अवस्था झाली आहे. घराच्या भिंतींना भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. नवीन गावात नुकताच संसार सुरू केलेले ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. शासनाने केलेले पुनर्वसनाचे खरे स्वरूप पहिल्याच पावसामुळे उघड झाले आहे.