माळेगावातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

0

बारामती । माळेगावातील रस्ते अत्यंत खराब असून खाचखळग्यांनी भरलेले आहेत. वाहनचालकांना कोणता खड्डा चुकवायचा असाच प्रश्‍न पडलेला असतो. पावसामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचल्याने खड्डेच लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहन चालवायचे कसे असा गंभीर प्रश्‍न चालकांना पडलेला असतो. गेल्या तीन चार वर्षापासून हे खड्डे आहेत. मात्र या खराब रस्त्याबद्दल येथील प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार येथील नागरीक करीत आहेत.

लोकसंख्या 7 लाखांवर
बारामती तालुक्यातील माळेगाव हे एक प्रमुख महत्त्वाच्या गावांपैकी गाव आहे. बारामतीच्या राजकारणात माळेगावला चांगलेच महत्त्व आहे. जवळपास सात लाखाच्यावर या गावाची लोकसंख्या आहे. माळेगाव सहकारी साखर कारखानाही आहे. तसेच शैक्षणिक संकुलात फार्मसी, इंजिनिअरिंग, आय.टी.आय., पदविका व महाविद्यालये तसेच दोन माध्यमिक विद्यालय असा भव्य परिसर आहे.

रस्त्यांची अवस्था अशी का?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून ग्रामपंचायतीला विविध करापोटी दरवर्षी 9 लाख रुपये मिळतात. राज्यसरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडून पाणीपट्टी करापोटी दिड लाख रुपये दर वर्षी मिळतात. तर बारामती सहकारी दूध व्यवसाय संस्था व स्थानिक घरपट्टी करापोटी 2 कोटींची वसुली होत असते. तरीही गावातील रस्त्यांची अवस्था अशी का? असा येथील रहिवाशांना प्रश्‍न पडला आहे. गावाच्या हद्दीतूनच निरा बारामती हा राज्य महामार्ग जात आहे. या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्याचा वाहनचालकांना चांगलाच त्रास होत आहे. याकडेही ग्रामपंचायत गांभिर्याने पाहत नसल्याचे बोलले जाते.

कोटींची थकबाकी
गावांतर्गत रस्त्यांसाठी व बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांसाठी 12 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्यांसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. एक कोटींची घरपट्टी थकलेली असून त्याची वसुलीही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सरपंच जयदिप दिलिपराव तावरे यांनी दै. जनशक्तिशी बोलताना दिली. थकबाकी ही श्रीमंत लोकांकडे असून काही प्रमाणात गरिबांकडेही आहे. ही वसुली करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गावातून जाणारा राज्यमार्ग शिरवली ते अंजणगाव यासाठी केंद्रसरकारकडून 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हे ही काम लवकरच सुरू होईल, असे सरपंच तावरे, उपसरपंच मोहिनी बाळासाहेब बनसोडे, ग्रामसेवक कैलास कारंडे यांनी सांगितले.

खराब रस्त्यांची रंगतेय चर्चा
माळेगाव हे बारामती तालुक्यापासून केवळ आठ किमीवर असल्यामुळे लोकांचे लक्ष या गावाकडे लागलेले असते. माळेगाव कारखान्याच्या कामासाठी ऊस उत्पादकांना व विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे या खराब रस्त्याची चर्चा सातत्याने होत राहते. गावातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत, अशी मागणी जोर धरत आहे. डांबर कमी प्रमाणात वापरल्यामुळे रस्ते लगेचच खराब झाले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना चांगलाच त्रास होतो आहे. तसेच गावासाठी भाजीमंडई ही चांगल्या स्वरुपाची असावी. त्यासाठीचे गाळे उंच ठिकाणी बांधून स्वच्छता रहावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.