दोन वजनकाटे सील : वैधमापन निरीक्षकाची कारवाई
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 10 टनाच्या दोन वजनकाट्यात साडेतीन टनामध्ये 5, 10 व 15 किलोची तफावत आढळल्याने वैधपामन निरीक्षकांनी सदर दोन काटे सील केले आहेत. कारखान्याने सदर वजनकाटा दुरुस्त करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतरच सदर काटा सुरू केला जाईल, असे आदेश वैधमापन निरीक्षक वाय. एस आगरवाल यांनी दिले आहेत.
वैधमापन निरीक्षक वजनकाटे नोंदणीसाठी माळेगाव कारखान्यात शुक्रवारी आले होते. याठिकाणी ऊस वजन करण्यासाठी 60 टन वजनक्षमतेचे दोन, 10 टन वजनक्षमतेचे दोन, 80 टन वजनक्षमतेचा एक असे पाच वजनकाटे आहेत. वजनकाटे तपासत असताना 10 टन वजन क्षमतेच्या वजनकाट्यामध्ये तीन ते साडेतीन टन वजनामध्ये 15 किलोची तफावत आढळल्याने त्यांनी दोन वजनकाटे सील केले. त्यामुळे उसाची वाहने वजनाकाट्याजवळ दिवसभर थांबून होती. यामध्ये बैलगाड्या मोठ्या प्रमाणावर होत्या. इतरही वजनकाट्यांचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. सायंकाळी दोन वजनाकाटे वगळता अन्य तीन वजनकाटे सुरू करण्यात आले. दरम्यान या प्रकारामुळे सभासदांनी गर्दी केली होती.
बुधवारपर्यंत दुरुस्ती करण्याचे आश्वासन
वजन काट्याची कॉर्नर टेस्ट व हाफ लोड टेस्ट घेताना कॉर्नर टेस्टमध्ये 3,800 किलो वजनामागे 5 किलो, 10 किलो व 15 किलो वजन कमी भरत असल्याचे निदर्शनास आले आहे.वास्तविक पाहता कारखान्याने या काट्यांची दुरुस्ती वेळेत करण्याची गरज आहे. वजनात तफावत आढळल्याने दोन वजनकाटे सील करण्यात आले आहेत. कारखाना प्रशासनाने बुधवारपर्यंत इंजिनिअर आणून सदर दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी हे वजनकाटे सुरू केले जातील, असे अगरवाल यांनी सांगितले.
संपर्क साधण्याचे आवाहन
वाहनांचे वजन करत असताना कारखान्यांनी अतिघाई करू नये. वजनकाट्यावर वाहन उभे केल्यानंतर थोडा वेळ दिला पाहिजे. एकापाठोपाठ अनेक वाहने असल्याने साहजिकच वजनकाट्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी रिमोटवर देखील वजनामध्ये बदल करण्याचे प्रकार घडले आहेत. चुकीचे प्रकार कोठे घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन अगरवाल यांनी यावेळी केले.
शेतकर्यांचे नुकसान करणार नाही!
माळेगाव कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे वजनकाटे स्टँपींगसाठी विलंब झाला हे मान्य आहे. मात्र, माळेगाव कारखान्याची जी विश्वासर्हता आहे, ती वजनकाट्यामध्ये देखील आहे. वैधमान निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत 10 टनी वजनकाट्यामध्ये साडेतीन टन वजनात कमी वजन येण्यापेक्षा अधिक पाच किलो वजन आढळल्याचा दावा तावरे यांनी करून माळेगाव कारखाना कदापिही शेतकर्यांचे नुकसान करत नसल्याचे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी संगितले.