9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट; शिवाजीराव नागवडे यांनी केले मार्गदर्शन
बारामती । बारामतीनजीकच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 61 वा गळीत हंगाम शुभारंभ मंगळवारी सकाळी राज्यसहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ संचालक व सहकारतज्ज्ञ चंदरअण्णा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
चालू हंगामात कारखान्याने 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कार्यक्षेत्रातील सभासदांचा साडेसहा लाख मे. टन व अडीच लाख मे. टन कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन ऊस गाळप करून हे उद्दीष्ट कारखाना पूर्ण करणार आहे. हा हंगाम सर्व दृष्टिने आव्हानात्मक असून कारखाना हे आव्हान पेलणार आहे. त्या दृष्टिने कारखान्याच्या व्यवस्थापनाने सर्व निर्णय काळजीपूर्वक घेतले आहेत. हा हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिने तोडणी व वाहतूक यंत्रणा आली आहे. यंत्रसामुग्रीचे आधुनिकीकरण व दुरुस्ती देखभालीची सर्व कामे पूर्ण केली असून कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे मटेरियल, केमिकल्स, गंध, चुना, बारदाना आदींच्या खरेदीबाबत कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, जेष्ठ संचालक चंदरअण्णा तावरे यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने व अधिकारी, कर्मचार्यांनी अथक प्रयत्न करून आधुनिकीकरण व दुरुस्ती देखभालीच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन अडचणी सोडवून कामे वेळेत पूर्ण केली आहेत. कामाच्या दर्जात कोणत्याही तडजोडी केलेल्या नाहीत. दर्जेदार काम हाच निकष कारखान्याने लावलेला आहे.
उच्चांकी भाव देण्याचा मानस
या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे शासननियुक्त संचालक अविनाश गोफणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कारखान्याचे चेअरमन रंजनकुमार तावरे यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या आधुनिकीकरणाची माहिती देऊन काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल अधिकारी कामगारवर्ग यांचे अभिनंदन करून येणार्या हंगामात उच्चांकी भाव देण्याचा मानस व्यक्त केला.
…तर उत्पादन खर्च कमी
कारखान्याचे जेष्ठ संचालक चंदरअण्णा तावरे यांनी मार्गदर्शन करताना कारखान्यासाठी सभासदांच्या ऊसाबरोबर गेटकेनची आवश्यकता असल्याचे सांगून जास्तीतजास्त गाळप केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन सभासदांना जास्तीचा दर देता येत असल्याचे सांगितले. गेटकेनच्या ऊसामुळे कारखाना कार्यक्षमतेने चालविला जाऊन सभासदांना निश्चितपणे ज्यादा भाव देता येतो. फक्त सभासदांच्याच ऊसाचे गाळप केल्यास प्रतिटन 500 रूपये कमी दर मिळणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
कारखानदारी वाढीवण्यासाठी प्रयत्न
राज्यसाखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी सहकारी साखर कारखानदारीबद्दल विचार व्यक्त करून पूर्वजांनी सुरू केलेली साखर कारखानदारी टिकवून ठेवून ती वाढविण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रकाश देवकाते, दिलिप ढवाण, शिवाजी ढवाण यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यकारी संचालक विजय वाबळे यांनी सूत्रसंचालन व आभार अविनाश गोखले यांनी केले.