पेरणी केलेले शेतकरी झाले हवालदिल
तळेगावः मावळ तालुक्याच्या पूर्व भागात दमदार मान्सूनच्या पावसाची आवश्यकता असून खरीप पिकांची पेरणी केलेले शेतकरी या पावसाचीआतुरतेने वाट बघत आहेत. तर आगमन लांबल्याने शेतकर्यांची चिंता वाढत चालली आहे. मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील गावामधील शेतक-यांनी खरीप भुईमुग, संकरित ज्वारी, कडधान्याची पेरणी केलेली असून या पेरणीसाठी नियमित पावसाची आवश्यकता आहे मात्र गेले 2 ते 3 आठवडे पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेले शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
अंदाज चुकल्याने शेतकरी चिंतेत
यावर्षी सर्व शासकीय यंत्रणेने आणि हवामान खात्यांनी पाऊस मुबलक आणि पुरेसा होईल असे सांगितले होते. त्यानुसार शेतकरी वर्गाने खरीप भात पिकाच्या रोपांची पेरणी केली तसेच इतर खरीप पिकेही पेरली होती. मात्र या सर्वांचा सुरुवातीचा अंदाज चुकल्या मुळे शेतकर्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर्षी मावळात सुमारे 30 हजार एकर क्षेत्रावर भातपिक घेण्याचे नियोजन असून त्यासाठी शेतकर्यांनी भाताच्या रोपांची पेरणी केली आहे. त्या रोपांची उगवण ही चांगली झाली आहे. मात्र भात खाचरांमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे पुर्नलावणी करता येत नाही. ज्या शेतकर्यांकडे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था आहे, अश्या शेतकर्यांनी त्या पाण्यावर भात लावणीचे काम सुरु केले आहे. असे असले तरीही या पिकासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.