मावळसह, कार्ला व वासुली परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

0

अवकाळी पावसाने मावळसह कार्ला परिसरला झोडपले

कार्ला : मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. रविवारी सायंकाळी तर सोमवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने झोडपल्याने हातात आलेले भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. नाणे मावळातील नेसावे येथील एक महिला व एक पुरुष तर कचरेवाडी येथील एक महिलेचा अंगावर वीज पडल्याने आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून मावळ परिसरासह कार्ला भागात भात कापणी चालु होती. शेतकरी भात पिक चांगले आल्याने खुश होता, परंतु ह्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून कापलेले भात पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे तांदूळ काळा पडण्याची व पेंढा खराब होणार आहे. शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले असून काही भागात गहु, ज्वारी, हरभरा, वाटाणा, मसूर पेरणी झाली असून या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ह्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. कार्ल्यासह, वेहरगाव, दहिवली, शिलाटणे, वाकसई, डोंगरगाव, पाटण, भाजे, देवले, वाकसई, देवघर परिसरासह नाणे मावळातील गावात ऐन दिवाळीत अस्मानीसंकट आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तरी लवकरात लवकर महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मावळ परिसरातील शेतकरी करत आहे.