प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शुक्रवारी संघटनात्मक आढावा बैठक
पिंपरी चिंचवड : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळसह शिरूर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी लढण्याची तयारी दर्शविली आहे. तर शिरूरसाठी आमदार महेश लांडगेंच्या नावाची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने पक्षाच्यावतीने या जागेवर आपला हक्क दाखविण्यास भाजपाने सुरूवात केली आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक…
हे देखील वाचा
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय संघटनात्मक आढावा बैठका घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वाल्हेकरवाडी येथे आहेर गार्डनमध्ये शुक्रवारी ही बैठक होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
12 मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा…
मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित राहणार आहेत. मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. या 12 मतदारसंघांतील पक्षाचा संघटनात्मक आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे या मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती किंवा जागावाटप याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे सेनेचे विद्यमान खासदार असलेल्या जागेवर भाजपाचा ‘डोळा’ असल्याचे समोर आले आहे.