तळेगाव दाभाडे : मावळ परिसरातील पाचव्या आणि सातव्या दिवसांच्या गणरायाचे सार्वजनिक विसर्जन केल्यानंतर मावळातील गणेशभक्त पुणे परिसरातील गणरायांचे दर्शन घेण्यासाठी तसेच देखावे, आरास व सजावट पाहण्यासाठी पुण्याकडे मोठ्या प्रमाणावर जात आहेत. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणार्या लोकल गाड्यांना आणि पीएमपीएमएलच्या बसगाड्यांना तोबा गर्दी वाढली आहे.
विसर्जनानंतर पुण्याकडे मोर्चा
मावळ तालुक्यातही पाच आणि सात दिवसाचे मोठे सार्वजनिक गणपती असतात. तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, पवनानगर, टाकवे या ठिकाणची काही नामवंत मंडळे अतिशय आकर्षक देखावे, सजावटी, आरास तसेच विद्युत रोषणाई करत असतात. त्यामुळे ही रोषणाई पाहण्यासाठी स्थानिक भक्तांची या ठिकाणी गर्दी होत असते. येथील गणरायांचे विसर्जन झाल्यानंतर सर्वांचा पुण्याकडे मोर्चा वळतो.
लोकल गाड्यांना पसंती
पुणे शहरातील नवसाला पावणारे काही गणपती असून, मावळ परिसरातील गणेशभक्त आपले नवस फेडण्यासाठी दरवर्षी आवर्जून पुण्यात जात असतात. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती, मंडई गणपती तसेच पुण्यातील इतर मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविक सायंकाळी रेल्वेच्या लोकल गाड्यांनी तसेच पीएमपीएमएलच्या बस गाड्यांनी जात असतात. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसात पुण्याकडे जाणार्यांची गर्दी वाढते. लोणावळ्यावरून पुण्याकडे जाणार्या व येणार्या रेल्वे लोकल गाड्या भरपूर असल्याने साधारणपणे दुपारी तीननंतर पुण्याला जाणे भाविक पसंत करतात. पाचनंतर पुण्यात पोहचल्यावर मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन व नवस फेडून मध्यरात्रीच्या अथवा पहाटेच्या रेल्वे लोकल गाडीने परत येता येते. त्यामुळे दरवर्षी भाविकांचा ओढा पुण्याकडे असतो.