तळेगाव दाभाडेः मावळातील मुसळधार पावसाने इंद्रायणी, पवना, कुंडलिका, आंद्रा, सुधा या नद्यांना पूर आला आला आहे. पुरामुळे नदीकाठी असलेली शेती पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणाचे पूल पाण्याखाली गेलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून मावळ तालुक्यात जोरदार पावसाने थैमान मांडले असून पश्चिम पट्ट्यातील पवनानगर, लोणावळा, खंडाळा, उसकान, खांडी, कुसूर या विभागात संततधार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळेगाव, इंदोरी, सोमाटणे या पूर्व भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिमपट्ट्यात संततधार पाऊस पडत असून काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्या दिल्या आहेत. तर काही भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याच रोडावली आहे. मुसळधार पावसाने तळेगाव आगारातून सुटणार्या एस. टी. बसगाड्या अनियमितपणे धावत आहे. तसेच काही भागातील रस्ते पावसामुळे उखडलेले असून संथगतीने वाहतूक चालू आहे.