लोणावळा : मावळात येणार्या पर्यटकांवर बंदी घालण्याऐवजी पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस खात्याने व राज्य शासनाने पावले उचलावीत, असे आवाहन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. लोणावळा, खंडाळा ही स्थळे पर्यटनासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या भागात येतात. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची संख्या मोठी असते. लोणावळा व खंडाळा येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात आलेली नाहीत. पर्यटकांसाठीदेखील कोणत्याही सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. ही बाब योग्य नाही, असेही खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
पर्यटकांना नाहक त्रास
मावळात येणार्या पर्यटकांना पार्किंग, सार्वजनिक टॉयलेट, ट्रॅफिकची समस्या, स्वच्छता या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच पोलीस खात्याच्या वतीने पर्यटकांच्या गाड्या लोणावळ्याच्या बाहेर अडवून त्यांना पायी जाण्यास भाग पाडणे, भुशी धरणावर जाण्यास बंदी घालणे, असे प्रकार होऊ लागले आहेत. दूरवरून येणार्या पर्यटकांना याचा खूप त्रास होत असून, लोणावळ्याबाहेर गाडी पार्किंग करून पुढे रिक्षाने जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. याचा परिणाम पर्यटनावर तसेच स्थानिक व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. असेच चालू राहिले तर पर्यटनाला फटका बसेल, अशी भीती बारणे यांनी व्यक्त केली.
पर्यटनमंत्र्यांना साकडे
पुणे ग्रामीण पोलीस तथा शासनाच्या वतीने सुविधा पुरवण्याऐवजी पर्यटकांना त्रास देण्यात येत आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पुणे ग्रामीण अधीक्षक व लोणावळा नगरपरिषदेला पत्र पाठवून लोणावळा-खंडाला या पर्यटन स्थळांना भेट देणार्या पर्यटकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.