तालुक्यातील गाव, वाड्या-वस्त्यात जावून, प्रत्यक्ष बैठक घेवून या योजनेबद्दल केले जागृत
शिरगाव : गेल्या काही महिन्यांपूर्वी वडगाव मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी ही कमिटी नव्याने नियुक्त केली होती. या कमिटीचे अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. योजनेचा अध्यक्ष या नात्याने या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळाला पाहिजे, असे वाटत होते. त्यासाठी मावळ तालुक्यातील 180 पैकी सुमारे 120 गाव, वाड्या वस्त्यात जावून, प्रत्यक्ष बैठक घेवून या योजनेचा फायदा घेण्यासाठी व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. याचा परिणाम म्हणून वर्षभरात संजय गांधी निराधार योजनेचा मावळ तालुक्यातील सुमारे 1440 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याची माहिती मावळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किरण राक्षे यांनी दिली.
दर महिन्याला होते बैठक
हे देखील वाचा
किरण राक्षे यांनी पुढे सांगितले की, या वर्षभराच्या प्रयत्नांनंतर परिणाम म्हणून आज नाणेमावळ, अंदर मावळ आणि पवन मावळ या परिसरातील सुमारे 1400 पेक्षा जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात श्रावण बाळ निराधार योजनेचा 690 लाभार्थ्यांना व संजय गांधी निराधार योजनेचा 750 लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. या योजनेच्या कमिटीची दर महिन्याला न चुकता बैठक घेवून पुढील महिन्यात राबवण्यात येणार्या बाबींची माहिती सांगून त्यावर रणनीती आखण्यात येते. त्यामुळे कमिटीमधील सर्व सदस्यांना याची माहिती मिळती आणि ती बैठकीद्वारे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचते. याचा परिणाम लाभार्थी वाढीवर होतो आहे. या योजनेचा सर्वात महत्वाचा आणि मुख्य पुरावा म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र होते. ते मिळण्याची प्रक्रिया पूर्वी किचकट होती ती आता आमदार भेगडे यांच्यामुळे सुटसुटीत झाली आहे.
पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा
त्यामुळे या योजनेला खर्या आणि गरज असणार्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाची मदत झाली. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्यासाठी वडगाव मावळ पंचाय समितीमध्ये संपर्क करून माहिती घ्यावी असे आवाहनही राक्षे यांनी केले. येत्या आगामी वर्षात या योजनेचा लाभ किमान तीन हजार लाभार्थ्यांना होईल असे ध्येय आम्ही निश्चित केले आहे. आम्ही सर्वजझ मिळून ते पूर्ण करू. पूर्वी 40 टक्के व त्यापेक्षा जास्त प्रमाणपत्र असणार्या दिव्यांगांना 400 रुपये ते 80 टक्के असणार्यांना 600 रुपये पेन्शन मिळत होती. आम्ही सर्वजण आमदार भेगडे यांना या रकमेत वाढ होण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी लगेच होकार देवून यासाठी प्रयत्न केले. आज या लाभार्थ्यांना आठशे ते एक हजार रुपये पेन्शन मिळते आहे, असेही यावेळी राक्षे यांनी सांगितले.