बारणे यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी देखील लागलेत तयारीला
मावळ : अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सध्या चर्चेत आहे. या बाबतची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचीही संभावणा व्यक्त केली जात आहे. भाजप शिवसेना युती होणार अथवा नाही यावर पार्थ यांच्या उमेदवारीचे गणित अवलंबून होते. तथापि आता युती होण्याची शक्यता कमी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. आणि, युती झाली तरी, हा मतदारसंघ शिवसेनेला जाण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर राजकीय स्पर्धक भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप पूर्ण शक्तीनिशी बारणे यांचे काम करण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळेच ’दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ’ या न्यायाने पार्थ यांना लाभ होण्याची शक्यता असल्याने त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे वाटत आहे.
सर्व सामान्यांना संधीचे काय ?
पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर सुरुवातीस शरद पवार अनुकूल नसल्याचे पहावयास मिळाले होते. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणार्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी करणार्या कार्यकर्त्यांना विचारला होता. मात्र, राजकीय डावपेचात तरबेज असलेल्या थोरल्या पवारांनी टाकलेला हा गुगली होता हे आता स्पष्ट होत आहे.
पार्थ पवारांचे पोस्टर्स झळकण्यास सुरुवात…
दरम्यान, पार्थ हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. ते मागील निवडणुकीत सक्रीय सहभागीही झाले होते. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांचे पक्षाच्या पोस्टवर फोटो देखील झळकल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार मैदानात निश्चितपणे उतरणार असल्याचे दिसत आहे.