पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : मावळ विधानसभा म्हणजे कमळ व कमळ म्हणजे मावळ असे सुत्रच पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीने तयार केले आहे. याला छेद देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही केवळ गटा-तटाच्या राजकारणामुळे त्यांची विधानसभेची संधी हुकत गेली आहे. तर शिवसेना व राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष फक्त पदाधिकार्यांपुरतेच मर्यादीत असून त्यांच्याकडे कार्यकर्त्याची मोठी वाणवा आहे. विरोधकांच्या या सर्व राजकीय उणीवा भाजपाच्या पथ्यावर पडत असून भाजप जिल्हयात येथे सुरवातीपासूनच प्रबळ आहे. तसेच सध्याही राहिल, अशीच स्थिती आहे. असे असले तरी भाजपाला पुढे तिकीट वाटपावरुन बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हेही तितकेच खरे.
ताकदीची पदे; पण राष्ट्रवादीची वाढ नाही
मावळ तालुका नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे येथील बहुतांशी सत्ताकेंद्रे भाजपाच्या ताब्यात आहेत. भाजपाला तालुक्यात फक्त राष्ट्रवादीच आव्हान देऊ शकते. तसे आव्हान यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादीने भाजपाला दिले आहे. त्यामुळेच मागील वेळी तळेगाव नगरपालिका ताब्यात होती. तसेच बापू भेगडे यांनी देखील विधानसभेला भाजपाच्या उमेदवारापुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, अनेक नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे राष्ट्रवादीला पुढे चाल मिळत नाही. मावळात माऊली दाभाडे, बापु भेगडे, नेवाळे गट राष्ट्रवादीत सक्रीय असला तरी विधानसभेच्या निवडणुकीत मात्र हा गट एकदिलाने काम करताना दिसत नाही, असा नेहमीच कार्यकत्यार्ंकडुन आरोप केला जातो. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक मेळाव्यात वरिष्ठांना एकत्र येण्याचे आवाहन करावे लागते. मेळाव्यापुरती एकत्र येणारी मंडळी पुन्हा पुढील मेळाव्यातच एकत्र आलेली दिसतात अशी येथील राष्ट्रवादीची शोकांतिका आहे. तरी देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्षपद, संचालक व जिल्हा दुध संघाचे संचालक अशी ताकदीची पदे देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आहेत. मात्र, त्याचा फायदा येथे राष्ट्रवादी वाढण्यास झाला नाही.
शिवसेना फक्त पदाधिकार्यांपुरतीच
मावळचा खासदार हा शिवसेनेचा आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. भाजपाच्या भक्कम आधारामुळे शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे सर्वाधिक मते घेतो. पण प्रत्यक्षात शिवसेनेची ताकद लोणवळ्यामध्ये मच्छिंद्र खराडे यांच्या माध्यमातुनच थोडीफार पाहण्यास मिळते. मावळात शिवसेनेच पदाधिकारी आहेत. मात्र पक्षाकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. ही परिस्थिती कॉग्रेसची देखील आहे. मदन बाफणा यांच्यारुपाने तालुक्याला मंत्रीपद मिळाले होते. पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कॉग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नुकताच बाफना यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाला कंटाळुन कॉग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. असे असले तरी शिवसेनेत किंवा कॉग्रेसमध्ये भाजपाला टक्कर देण्याच्या तोडीचा एकही उमेदवार नाही हेही तितकेच खरे आहे.
बाळा भेगडे यांना मिळेल पुन्हा संधी
भाजपाकडून एका उमेदवाराला दोनपेक्षा अधिक वेळा संधी मिळत नाही. हा मावळ विधानसभेचा इतिहास आहे. त्यामुळे भाजपचे विदयमान आमदार असलेले बाळा भेगडे यांना पुन्हा संधी मिळेल का? या बाबत मतदार संघात उलट सुलट चर्चा आहेत. मंत्री पदाच्या विस्ताराची राज्यपातळीवर नेहमीच चर्चा असल्यास भेगडे यांचे नाव घेतले जाते. सध्या भेगडे हे पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा संभाळत आहेत. यापुर्वीही त्यांनी युवा मोर्चाचे प्रदेश पातळीवरील पददेखील भूषविले आहे. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हयात पक्षाने अनेक निवडणुकांत चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे भेगडे यांनी वरिष्ठांचे लक्ष नेहमीच वेधून घेतले आहे. त्या बरोबरच संघाची ताकदही त्यांच्यापाठी मागे उभी असल्याने या वेळेसही त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीत युती तुटली तर मावळमधून आमदार जगताप यांच्या बरोबर भेगडे यांचे देखील लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे नाव येण्याची दाट शक्यता आहे.
शेळके यांनी मतदारसंघाचे वेधले लक्ष
तळेगाव नगरपालिकेचे भाजपाचे उपनगराध्यक्ष व स्व. गोपीनाथ मुढे प्रतिष्ठान मावळचे अध्यक्ष सुनिल शेळके यांनी विधानसभेची जोरदार तयारी केली आहे. या तयारीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन ते मतदारांपर्यत पोहोचत आहेत. पक्ष दोनपेक्षा अधिक वेळा कुणालाही संधी देत नसल्यामुळे शेळके आत्तापासून ताकदीने मैदानात उतरले आहेत. पक्षाने इतिहासाची पुन्हा मांडणी केल्यास शेळके यांना तिकीट मिळु शकते व भेगडेना लोकसभेचे असा एक मतप्रवाह मतदारसंघात पुढे येऊ लागला आहे. त्यामुळेच शेळके यांच्याकडे देखील कार्यकर्त्यांची संच वाढला जात आहे. शेळके यांना तिकीट न मिळाल्यास शेळके काय भूमिका घेणार हे देखील महत्वाचे आहे.
बापू भेगडे अदयापतरी शांतच
राष्ट्रवादीचा प्रबळ तरुण चेहरा म्हणुन बापु भेगडे यांच्याकडे पाहिले जाते. भेगडेंनी दोन्ही वेळेस भाजपाच्या उमेदवाराल येथून मोठे आव्हान उभे केले होते. पण सध्याची भाजपाची वाढलेली ताकद पाहता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील की भाजपा प्रवेशाचा मार्ग स्विकारतील हे देखील एक कोडेच आहे. कारण बापुंना भाजपामध्ये घेण्यासाठी पक्षाचा एक गट सक्रीय असून बापूनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास येथे नविन राजकीय समिकरणे आकारास येतली त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादीला देखील आयात प्रबळ उमेदवार मिळु शकेल.