मावळात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

0

शिरगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यात झालेला जोरदार पाऊस आणि त्यानंतर बदललेल्या वातावरणाचा फटका भात पिकाला बसला आहे. शिरगाव, सोमाटणेसह संपूर्ण मावळातील भात पिकावर सध्या करपा आणि बुरशी सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. करपा आणि बुरशी रोग लवकर नियंत्रणात आला नाही तर, उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे मावळातील शेतकरीवर्गातील कमालीची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मनातील भीती दूर व्हावी, त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे, या उद्देशाने मावळ तालुका कृषी विभागाचे अधिकारी तसेच लोणावळा येथील भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी काही गावांमध्ये जाऊन भात पिकाची पाहणी केली. या पाहणीवेळी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी आवश्यक ती किटकनाशक फवारणी तसेच पुढील फवारणीविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज
गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे मावळातील सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, गहुंजे आदी गावांमध्ये भात पिकावर मोठ्या प्रमाणात करपा तांबोरा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रोग वेळीच नियंत्रणात आला नाही तर पीक हातून जाण्याची तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. करपा तांबोरा आणि बुरशीजन्य रोगामुळे सुरुवातीला भात पिकाच्या पानांचे शेंडे पिवळे पडतात. त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण पीकच पिवळे पडते. या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी साळुंब्रे येथील भात उत्पादक शेतकरी दिलीप राक्षे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना केली.

दरवर्षी होतो रोगाचा प्रादुर्भाव
भात उत्पादक शेतकरी दिलीप राक्षे पुढे म्हणाले की, आमच्या शेतातील भात पिकावर करपा आणि तुडतुडे हे रोग पडले आहेत. त्यामुळे शेतातील भाताची पाने पिवळी पडत चालली आहेत. आम्ही औषध फवारणी चालू केली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वातावरणातील बदलामुळे हा रोग भात पिकावर पडतो. जर या रोगाचे लवकरात लवकर निर्मुलन झाले नाही तर, संपूर्ण पीक वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे या रोगावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे, असे राक्षे यांनी सांगितले.

कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज
भात पिकावर करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, किंवा करपा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाच तर काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात शेतकर्‍यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. करपा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जुन्याच पद्धतीने फवारणी व अन्य उपाययोजना करतात. त्यामुळे या रोगावर एकतर उशिराने नियंत्रण मिळते, नाहीतर पीक हातून निघून जाते. अत्याधुनिक पद्धती शेतकर्‍यांना समजावून सांगितली पाहिजे. प्रभावी किटकनाशकांची तसेच चांगली मूलद्रव्य असलेली औषधी याविषयी शेतकर्‍यांना माहिती दिली पाहिजे, अशी मागणी जाणकार शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

परिस्थितीची पाहणी
दरवर्षी भात पिकावर करपा व बुरशीजन्य रोग पडला की, शेतकरी आधीच अर्धा घायाळ होतो. सध्या सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, गहुंजे आदी गावांमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी केल्याने मावळ तालुका कृषी विभागाने पुढाकार घेतला. परिसरातील प्रगतीशिल शेतकर्‍यांना सोबत घेऊन कृषी विभागाच्या अधिकार्‍यांसह लोणावळा भात संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी विविध गावातील शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन परिस्थिती जाणून घेतली. तसेच शेतकर्‍यांना मार्गदर्शनदेखील केले.

योग्य औषध फवारणीची गरज
या रोगांविषयी तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये भाताचे पीक घेतले जाते. मात्र, सद्यस्थितीत वातावरणातील बदलांमुळे भात पिकावर करपा व बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच योग्य औषध फवारणी केली तर त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन कोथिंबीरे यांनी केले. मावळ तालुका कृषी विभाग व लोणावळा येथील भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर, डॉ. युवराज बालगुडे यांनी काही गावात जाऊन प्रत्यक्ष प्लॉट पाहणी केली. या रोगावर नित्रयंण मिळवण्यासाठी 25 ग्राम कॉपर क्लोराईड, स्टेपटोसायक्लीन 2.5 ग्राम, स्तीकेर 10 मिली 10 लीटर पाण्यातून फवारणी करावी. पुन्हा 10 दिवसांनी हीच फवारणी करावी. यासाठी हेक्टरी 500 रुपये अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध आहे.