लोकसभेसाठी खा. बारणे, आ. जगताप अन् वाघेरे येणार
पिंपरी-चिंचवड : लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी आहे. परंतु, आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे संकेत आहेत. तर, रायगड जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या शेकापचे पत्ते गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे सध्यातरी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीकडून माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील हे आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे.
मोदी लाटेचा खा. बारणेंना झाला होता फायदा!
मावळ लोकसभा मतदारसंघ हा मोठा मतदार संघ आहे. या मतदारसंघाचा भाग नवी मुंबईपर्यंत येतो. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत-खालापूर यामध्ये तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर, दोन मतदार संघात शिवसेनेचे आणि एका मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. या मतदारसंघाची 2009 मध्ये स्थापना झाल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. 2009 आणि 2014 मध्ये दोन्ही वेळा पिंपरी-चिंचवड शहरातील उमेदवार या मतदारसंघातून निवडून आला आहेत. आगामी 2019 च्या निवडणुकीतदेखील या मतदारसंघात पिंपरी शहरातील नेत्यांमध्येच निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची देशभर लाट होती. या लाटेचा फायदा मावळ लोकसभा मतदारसंघातदेखील झाला आणि नगरसेवक असलेले श्रीरंग बारणे थेट खासदार म्हणून निवडून ले. त्यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविलेले आणि आता भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष असलेले लक्ष्मण जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. 2014 मध्ये राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावा लागला होता. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ऐनवेळी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार्या नार्वेकर यांनी दोन लाखाच्या आसपास मते घेतली होती. ती दुर्लक्षित करणारी नाहीत.
मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा?
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. पिंपरी-चिंचवड, पनवेल महापालिकेत, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषेदत, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपने आपली पाळेमुळे खोल रुजविली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकेल. तसेच शिवसेनेला मानणारा मोठा वर्गदेखील या मतदारसंघात आहे. तर, राष्ट्रवादीचा मूळ मतदार या मावळ लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात असून, अलिबागमध्ये वर्चस्व असलेला शेतकरी कामगार पक्ष यंदा राष्ट्रवादीसोबत आहे. रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शेकापची सत्ता आहे. याचा आणि शिवसेना-भाजपच्या मतांमधील विभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो, असा जाणकारांचा सूर आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हेही ’दक्ष’ झाले आहेत. त्यांनी मावळच्या रणांगणात उडी घेतली आहे. त्यांना बारणे यांच्याकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. त्यामुळे काहीही करुन लोकसभा निवडणूक लढवायची असा संकल्प त्यांनी सोडला असल्याचे, त्यांचे समर्थक बोलत आहेत. भाजपची उमेदवारी त्यांना जवळपास निश्चित मानली जात आहे. तर, ऐनवेळी पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर किंवा मावळचे आमदार बाळा भेगडे यांचेदेखील नाव पुढे येऊ शकते.
भावकी, गावकीचा वाघेरेंना फायदा!
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील तीव्र इच्छुक आहेत. यावेळी त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यांच्या समर्थकांकडूनदेखील भावी खासदार असा उल्लेख केला जातो. ते राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकतो. मागीलवेळीदेखील ते तीव्र इच्छुक होते. परंतु, पक्षाने ऐनवेळी राहुल नार्वेकर यांना पुढे आणले होते. एकंदरीत लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी आत्तापासूनच सगळ्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खासदार बारणे यांनी मतदार संघातील नागरिकांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ते मतदारसंघात जात आहेत. लक्ष्मण जगताप यांनी सत्तेच्या माध्यमातून विकासकामे करण्यावर भर दिला आहे. तर, संजोग वाघेरे हे आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या कामाविरोधात, धोरणाविरोधात आंदोलन करून वातावरण निर्माण करत आहेत.