तळेगाव स्टेशन : जि.प.आरोग्य अधिकारी यांनी मावळातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रास व 13 उपकेंद्रांना नुकतीच मंजुरी दिली. यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी विशेष प्रयत्न केले. आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्या आरोग्य संस्थांच्या ब्रुहत आराखड्यातील मार्गदर्शक तत्वानुसार सन 2011 च्या लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला.
यावर जिल्हा आरोग्य समितीने सविस्तर चर्चा करुन मंजुरी देण्यात आली. मावळातील कुसगाव बु॥, कातवी,नवलाख उंबरे,सुदुंबरे,कांब्रे ना.मा.,शिरदे, सावळा,भोयरे, करुंज, बौर, उर्से,शिरगाव, व कुणे ना.मा. या 13 गावांमध्ये जि.प.प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना तर इंदोरी येथे जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. इंदोरी येथे सध्या आरोग्य उपकें द्र आहे.