मावळ आणि खेड तालुक्याला जोडणारा रस्त्यावर खड्ड्यांची झाली दुरवस्था

0

पिंपरी-चिंचवड शहरात आणि ग्रामीण भागात सर्वत्र पावसामुळे खड्डे पडले; मिंडेवाडी, करंजविहीरे रस्त्याची झाली चाळण
करंजविहिरे परिसरातील अनेकांचा रोजचा प्रवास याच रस्त्याने

टाकवे बुद्रुक- यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरला असून पिंपरी-चिंचवड शहरात आणि ग्रामीण भागात सर्वत्र पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे. नागरिकांना यामुळे खूप दुखणे येते आहे. वडगाव मावळ आणि खेड तालुक्याला जोडणारा नवलाख उंब्रे, मिंडेवाडी, करंजविहीरे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याने चारचाकी वाहनातून प्रवास करा किंवा दुचाकीवरून घरी पोहचल्यावर गरम पाण्याने आंघोळ करून चार तास विश्रांतीच घ्यावी लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर या रस्त्याला खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकून पुढे जायचे हा प्रश्‍न वाहनचालकांना पडतो आहे. तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहतीचा रस्ता संपल्यावर नवलाखउंब्रे गावात पोहचल्यावर खड्डेमय रस्ता सुरू होतो. पेट्रोलपंप ओलांडून पुढे जातो ना जातो तोच खड्ड्यात आदळून आदळून आपण उद्या राहू की नाही याची जाणीव करून देतात. यामुळे वाहनचालकांना खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.

खड्डेमय रस्त्यांनी प्रवास धोकादायक
येथून जवळ गावात जाण्यासाठी लहान पूल आहे. परंतु हा पूल पडतो की काय, अशी भीती त्यावरून जाताना वाटते. पुलाच्या दोन्ही बाजूला तडे जाऊन तो धोकादायक परिस्थितीत असल्याची जाणीव होते. तेथे इतके खड्डे पडले आहेत की विचारता सोय नाही. याच पूलावर ऑईल मिश्रित पाण्याचा थर पसरला आहे. त्यामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या पुलाच्या पुढे बधालेवाडी, मिंडेवाडीची खिंड ओलांडून पलिकडे जाईपर्यंत कधी आपण खड्ड्यात दुचाकीवरून कधी खाली पडाल याचा नेम नाही. चारचाकीने जात असल्यास जास्त काळजी घ्यावी लागते. पलीकडील दिशेने येणारा दुचाकीस्वार चारचाकीवर कधी आदळेल याचा भरवसा नाही. या मार्गाने वाहतूक वाढली आहे. खेड तालुक्यातील पश्‍चिम भागातील पाईट, कडूस, देशमुखवाडी, तोरणे, वाशेरे, औदर, गडद परिसरातील नागरिक मुंबईला जाताना धामणे मार्गे येत जात आहे. करंजविहीरे पंचक्रोशीतील अनेक तरूण याच मार्गे तळेगाव औद्योगिक वसाहतीत नोकरीला येत आहे. काही दुग्ध व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी देखील येतात.

बांधकाम विभागाने पाहणी करावी
या खड्ड्यांबाबत बोलताना येथील रहिवासी विक्रम कदम व जालिंदर शेटे यांनी सांगितले की, मावळ-खेड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहने चालविणे येथील नागरिकांना मोठे कसरतीचे झाले आहे. अवजड वाहने मिंडेवाडीला गेल्याने खड्डे अधिक मोठे झाले. त्यावर भराव टाकला नाही किंवा दुरुस्ती केली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून दुरूस्तीसाठी पावसाळ्यात किमान मुरूम मातीचा भराव तरी टाकावा.