मावळ तालुक्यातील युवकांकडून दुचाकीवरून लेह मोहीम फत्ते!

0

लोणावळा : मावळ तालुक्यातील लोणावळ्याचे प्रतीक पाळेकर, कृष्णा साळवे, तळेगाव दाभाडे येथील मनीष वरघडे, प्रतीक कुलकर्णी या चार तरुणांनी जिद्दीने, आत्मविश्वासाने अवघ्या पंधरा दिवसांत लोणावळा-लेह-लोणावळा हा खडतर प्रवास व आव्हान दुचाकीवर पार करीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सातशे किलोमीटरचा पहिला टप्पा
कोणत्याही स्वरूपाचा अनुभव नसताना लेह, लडाखचा पल्ला गाठण्याचे आव्हान या युवकांपुढे होते. त्यांच्या या संपूर्ण मोहिमेतील अनुभव प्रतीक पाळेकर आणि मनीष वरघडे यांनी कथन केला. प्रतीक म्हणाला, जवळपास सातशे किलोमीटरचे अंतर कापत अहमदाबाद येथे पहिला टप्पा पार केला. या ठिकाणी विश्रांती घेतल्यावर दुसर्‍या दिवशी पुन्हा प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी उदयपूर, पानिपत, चंदीगड, पठाणकोट आणि हिमाचल प्रदेशमधील मनाली हे अंतर अत्यंत वेगात पार केले. मात्र तेथून पुढील टप्पा हा अत्यंत खडतर असा स्वरूपाचा होता. मनाली येथून भल्या पहाटे रोहोतंग पास मार्गे कठीण समजल्या जाणार्‍या व देशातील सर्वात उंच मानल्या जाणार्‍या मार्गाने लेहच्या दिशेने प्रस्थान केले. रोहतांग नंतर सारचुला व लेहपर्यंतचा रस्ता खूपच खराब असल्याने वेगावर मर्यादा आल्या.

कडाक्याच्या थंडीत मुक्काम
मनिष वरघडे याने सांगितले, सारचुला येथे कडाक्याच्या थंडीत मुक्काम केला. अति उंचीवर असल्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मी आजारी पडलो. दुचाकी चालविणेही त्याच्यासाठी कठीण होऊन बसले होते. तरीही धीर न सोडता पुढचा प्रवास सुरू ठेवला. आणि त्यातूनच मनोबल अजूनच वाढले. कृष्णा साळवे याने लेहपासून श्रीनगरचा प्रवास आव्हानात्मक असल्याचे सांगत सोनमार्ग येथे दहशतवादी हल्ल्यामुळे सैन्यदलातील जवानांनी सोनमार्ग येथेच अडविल्यानंतर रात्र रस्त्यावरच काढावी लागली. मात्र सैनिकांनी मदत केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या मोहिमेसाठी लष्करातील निवृत्त ब्रिगेडियर संजय होले, पुणे विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी मारुती केदारी यांचे मार्गदर्शन मिळाले.