मावळमधील घोरावडेश्वर क्षेत्र म्हणजे भक्ति-शक्ती स्थळ; तळेगाव, आळंदीतही उत्साह
शिरगाव : क्षेत्र घोरवडेश्वर म्हणजे मावळवासीयांचे एक शक्तीस्थळ आहे. मावळ तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा उल्लेख केला तर यात घोरवडेश्वर नाव आलं नाही तर नवलच. ते शेलारवाडी जवळ असलेल्या डोंगर रांगांमध्ये आहे. दर शिवरात्रीला येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
अमरदेवी देवी येथे अवतीर्ण
या मंदिराचे अनेकविध पैलू व इतिहासही या मंदिराला लाभला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाताना द्रुतगतीमार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग यांच्यामध्ये असणार्या डोंगररांगा आहेत. याच डोंगरामध्ये एक कोरीव अशी पांडव कालीन लेणी आणि दगडातच कोरलेले शंकराचे अगदी जुने असे मनमोहक मंदिर आहे. ज्याचे नाव घोरावडेश्वर! पांडव अज्ञात वासात होते तेव्हा त्यांनी या मंदिराची उभारणी केली असल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. या मंदिराच्या पायथ्याशी वसलेलं अमरजाई देवीच मंदिर आहे. या पांडवांची काळजी घेण्यास स्वतः अमरदेवी देवी येथे अवतीर्ण झाल्याचेही सांगितले जाते. मंदिर हे पूर्णपणे खडकामध्ये कोरलेले असल्याने याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत जाते. शिवाय जवळच अगदी काही फुटांवर बौद्धकालीन आणि अतिपुरातन अशा लेण्यामध्ये सुमारे 9 खोल्या आहेत. ज्यात साधू तप करण्यासाठी बसत अशा कथा सांगितल्या जातात. येथील लेण्या आणि खोल्या खडकांमधेच कोरल्या आहेत. या मंदिराचे सौंदर्य म्हणजे शंकराचे प्रचंड मोठे असे शिवलिंग तेही पूर्णपणे दगडामध्ये कोरीव आहे गाभार्याठी तीन ते चार कोरलेल्या खोल्या आहेत. विठ्ठल रुखमाईच्या अगदी लोभस अशा मूर्ती आहेत. याच मंदिरात कधी-कधी संत तुकाराम महाराज अभंग लिहायला यायचे अशा कथाही सांगितल्या जातात. या लेण्यांचे एक विशेष आकर्षण म्हणजे येथे असलेल्या पाण्याच्या टाक्या सध्या चार ते पाचच शिल्लक आहेत. ज्यात पूर्ण वर्षभर स्वच्छ व शीतल असे पाणी असते.
तीनशे ते साडेतीनशे पायर्या
या मंदिरात जाण्यासाठी तीनशे ते साडेतीनशे पायर्या आहेत. परंतु वाकड्या-तिकड्या नागमोडी वळणे घेत जाणार्या वाटेवरून जाणेच बरेच पर्यटक पसंत करतात. या संपूर्ण पायर्यांवर प्रकाशाची सोय केली असल्याने रात्री हे मंदिर अतिशय आकर्षक भासते. मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त घोरवडेश्वर येथे दर्शनासाठी शिवभक्तांचा जणू जनसागरच लोटला होता. घोरावडेश्वर डोंगरावर भरणार्या यात्रेनिमित्त जाणार्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी फराळ तसेच शरबत व थंड पाणी वाटप केले जात होते. अनेक स्वयंसेवी संस्थांनी महामार्गालगत मंडप उभारून भाविकांची सेवा केली.