मावळ मतदारसंघासाठी भाजपची ‘मिस्ड कॉल’ मोहीम

0

मतदारसंघातील महापालिका ते ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचीच सत्ता

मतदारसंघ भाजपाला द्या; कार्यकर्त्यांचा आग्रह

पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघावर भाजपने आपला दावा कायम ठेवला आहे. मावळ मतदारसंघ मिळवण्यासाठी नागरिकांचा जास्तीत पाठिंबा घेण्याच्या उद्देशाने भाजपने मिस्डकॉल मोहीम सुरू केली आहे. 8080231231 या मोबाईल क्रमांकावर मिस्डकॉल करून मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, हे पिंपरी चिंचवड शहरच ठरवते. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आहे. याशिवाय मावळ विधानसभा आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातील महापालिका ते ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचीच सत्ता आहे. या मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकावर आहे.

कार्यकर्त्यांकडून जोरदार ताकद…

मावळ मतदासंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेऐवजी भाजपला मिळावा, असा संपूर्ण मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांनी निवेदनही दिले आहे. आता मावळ मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळाला पाहिजे, यासाठी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार ताकद लावण्याचा निश्‍चय केला आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिस्ड कॉल मोहीम सुरू केली आहे.

मोहिमेला प्रतिसाद…

मावळच्या सर्वांगिण विकासासाठी, मतदारसंघ हवा भाजपसाठी ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्ते 8080231231 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे सोशल मीडियावर आवाहन करत आहेत. या मिस्ड कॉल मोहिमेतून मावळ मतदारसंघ भाजपला सुटावा, यासाठी नागरिकांचाही पाठिंबा मिळवण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. या मिस्ड कॉल मोहिमेला नागरिकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.