शरद पवार वाढदिवसानिमित्त शहरभर झळकलेल्या फ्लेक्सवर छबी
भाजप-शिवसेना चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने मारली उडी
अविनाश म्हाकवेकर/पिंपरी-चिंचवड-सलग 15 वर्षे पुणे जिल्ह्यात वर्चस्व असूनही मावळ लोकसभा मतदारसंघात लागोपाठ दोनवेळा झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पहिल्या निवडणुकीत पक्षातील फितुरी उघड झाली. दुसर्या निवडणुकीत हुकमी उमेदवाराने पक्षाला मारलेली टांग व ऐनवेळी आयात करावा लागलेला उमेदवार ही पराभवाची कारणे ठरली. मात्र, दोन्ही निवडणुकीत भाजपने दिलेली प्रामाणिक साथ व शिवसैनिकांनी दाखविलेली कट्टर एकनिष्ठता यामुळे सलग दोनवेळा शिवसेनेचा खासदार झाला. त्याचमुळे पराभवाची हॅट्ट्रिक होवू नये आणि मागील पराभवांच्या कारणावर नेमके उत्तर म्हणून शरद पवार यांनी पार्थ पवार हे उत्तर शोधले आहे. या नावामुळे सर्वगट-तट विसरून कार्यकर्त्यांची एकजुट होईल असा विश्वास सर्वांना वाटतो आहे. तसेच सेना-भाजप युती झाली तरी आणि नाही झाली तरी निश्चितपणे होणार्या मतविभागणीचा फायदा उठविण्याचाही होरा यामागे आहे. याचमुळे आज अखेरपर्यंतच्या लढतीत पक्षातर्फे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांची नावे होती त्यापेक्षा पार्थ नाव उजवे असल्याचे मानले जात आहे.
पहिला पराभव फंदफितुरीने
2008 साली अनेक लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यातील एक म्हणजे मावळ. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात सत्ता होती. याला हा मतदारसंघही अपवाद नव्हता. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपालिका, महापालिकेपासून विधानसभपर्यंत सर्वकाही राष्ट्रवादी होते. 2009 साली या नव्या मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीचा खासदार होणार याची निश्चिंती होती. मात्र, पराभव पत्करावा लागला. हा पक्षाला धक्का होता. पराभवाची कारणे सांगताना फंदफितुरी असे म्हटले. इतर कारणे उघड असतानाही मात्र स्पष्टपणे सांगितली नाहीत. या पराभव फारसा मनावर घेतला नाही. कारण लोकसभेची एक जागा वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात होत्या.
दुसर्यावेळी आयात उमेदवार
2014 ला दुसरी निवडणूक झाली. यात निवडणुकीआधीच पक्षाचा पराभव झाला. कारण हुकमी उमेदवार म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्यांनीच ऐनवेळी टांग मारली. पक्ष सोडला. एवढेच नव्हेतर शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेवून निवडणूक लढली. यामुळे पक्षाला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. उमेदवारी स्विकारायला कोण मानसिकरित्या तयार नव्हते. कारण निवडणुकीसाठीची सर्व तर्हेने तयारी म्हणून लागते तीच नव्हती. साहजिकच पक्षावर उमेदवार आयात करण्याची वेळ आली. शिवसेनेच्या राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात उमेदवारीचा हार टाकला. मात्र, शहराशी, तिथल्या कार्यकर्त्यांशी दूरान्वयेही संबध नसल्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.
2019 साठीही थोडी साशंकता
हे देखील वाचा
आता 2019ची निवडणूक होत आहे. उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक दावे आहेत. एक-दोघांची नावे ठळक चर्चेत आहेत. तयारी करा असा संदेश मिळाला आहे, असे सांगितले जात आहे. अनेक कार्यक्रमांचे नियोजन, आयोजन करण्याबरोबरच पुरस्कर्ते होण्यावरही ÷त्यांचा भर राहिलेला आहे. मतदारसंघांत पायपीटही सुरू आहे. त्यासाठी शहरातील संपर्क थोडा कमी करून अनोळखी मतदार संघात दौरे केले जात आहेत. एवढे असले तरी मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. भाजपची ताकद वाढली आहे. याचमुळे राष्ट्रवादीला विजय कितपत याबद्दल पक्षाच्या ‘गाभा संघ’ बैठकीत साशंकता व्यक्त होती. यातच आता पार्थ पवार यांचे नाव एकदम चर्चेत आले आहे.
पार्थची छबी बळेबळे नाही
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघात शुभेच्छापर फलक लागले आहेत. दरवर्षी हे लागतात. शहरात सत्ता नसली तरी फलकांच्या संख्येत अजिबात फरक नाही. उलट गर्दीत वाढच झाली आहे. फलकांवर नेहमीप्रमाणे पवार यांच्या जोडीला अजित पवार आणि संबधीत स्थानिक नेत्यांची छायाचित्रे असतात. मात्र, यावेळी पवार यांचा नातू आणि अजितदादांचा पुत्र पार्थ याची छबी सर्वच फलकांवर झळकली आहे. कोणीही हे उगीचच किंवा बळेबळे लावलेले नाही. कारण असे ‘प्रेम’ दाखविण्याचे धाडस कोणी दाखवणार नाही. कारण तसे केल्यास कारवाई होण्याचाच धोका अधिक आहे. याचमुळे सूचना आल्यामुळेच ‘पार्थ’ झळकले आहेत हे निश्चित.
उमेदवारी मागे पक्की कारणे
पार्थ यांना उमेदवारी देण्यामागे पक्की काही कारणे आहेत. एक म्हणजे दोन्ही निवडणुकीतील कारणे सांगायला वाव नाही. तसेच कोणताही उमेदवार दिला तरी तो सर्वमान्य ठरेलच असे नाही. कधी तो अजितदादांच्या जवळच्या, तरी कधी पवारांच्या जवळचा आहे अशासह अनेक कारणे कार्यकर्त्यांकडे तयार असतात. तसेच यावेळी गेल्या पाच वर्षात कमावण्यापेक्षा गमाविण्याचेच प्रमाण अधिक राहिले आहे. महापालिकेची सत्ता हातातून गेली. नगरपालिका गेल्या. इतकेच कशाला ग्रामपंचायतीही राहिल्या नाहीत. त्यातच पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी साथ सोडली. भरभरून पदे देवूनही आणि पिंपरी-चिंचवड शहरात भरपूर कामे करूनही पदरी अपयशी आले आहे. तसेच संबधीत सहा विधानसभा मतदार संघापैकी एकच मतदारसंघ पक्षाकडे राहिलेला आहे. यातूनच पार्थ यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे.
अपिल करणारा चेहरा
सध्याच्या चित्रात लढत शिवसेना व भाजप यांच्यातच होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, पार्थ यांच्या छबीमुळे एका रात्रीत सगळे आडाखे बदलले गेले आहेत. कारण पार्थची उमेदवारी म्हणजे गट-तट करायची संधी कोणाला नाही, उमेदवार पसंत नाही अशी म्हणायची कोणाची टाप नाही, पराभवानंतर पवारांचा संपर्कच तुटला असे म्हणायचे धाडस नाही. त्यातच पार्थ हे उच्चशिक्षित आहे. अगदी तरुण चेहरा आहे. आजोबा-वडिलांचा वारसा आहे. पक्षाचे काम आहे. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा संगम आहे. तसेच पहिल्यांदाच मतदान करणारा युवक वर्ग की ज्याचा राजकारणाशी कोणताही संबध नाही त्यांना आकर्षित करणारा चेहरा आहे.
हे आहे बिनचूक उत्तर
भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बंजारा समाजाच्या मेळाव्यात एकत्रितपणे नगारे वाजविले आहेत. त्यामुळे युती होईल असा अंदाज आहे. राजकीय वारेही बदलाचे वाहू लागले आहेत. त्यामुळे देशात भाजप विरोधी पक्षांची आघाडी होत आहे. या आघाडीमध्ये पवारांचे नेतृत्व आहे. आणि अशा स्थितीत स्वत:च्याच पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असा शिक्का बसू नये याचीही काळजी पवारांनी पार्थच्या निवडीमागे घेतली आहे. युती झाली तरी मावळात पक्षीय पातळीपेक्षा दोन्ही उमेदवारांमधील हाडवैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे कोणाचीच मते दुसर्याला मिळणार नाहीत. भाजपची पारंपरिक मतेही सेनेकडे वळणार नाहीत. कारण इतक्या टोकाला जावून राज्यात सेनेने अगोदर आरोप केलेले आहेत. याचाच लाभ म्हणून राष्ट्रवादीकडून आपल्या विजयाचे गणित मांडले आहेत. तरीही समिकरण बिघडू नये म्हणून आणि बिनचूक उत्तर म्हणून पार्थ यांना उमेदवार म्हणून पुढे आणले जात आहे.