पिंपरी-चिंचवड/पुणे : कोणत्याही परिस्थितीत शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपने सज्ज रहावे, तशी रणनीती आखावी, अशी सूचना प्रदेश पातळीवरून प्राप्त झाली असून, शिवसेनेच्या ताब्यात असलेले हे मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे स्थानिक नेतृत्व कामाला लागले आहे. मिशन-2019 अंतर्गत प्रत्येक नगरसेवकाला 1300 बूथवर प्रत्येकी दहा कार्यकर्ते तयार करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मावळमधून विद्यमान आ. लक्ष्मण जगताप तर शिरूरमधून भोसरीचे आ. महेशदादा लांडगे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. देशात मोदी लाट कायम असून, आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा फायदा या नेत्यांना होईल, असा विश्वास राजकीय नेत्यांना आहे. केंद्रातही मोदींनाच सत्तावापसी मिळेल, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नजीकच्या काळात जगताप-लांडगे हे राजधानी दिल्लीत दिसू शकतात, असेही या नेत्यांनी ‘जनशक्ति‘शी बोलताना सांगितले.
मावळमधून आ. जगताप, शिरूरमधून आ. लांडगे भाजपचे उमेदवार!
भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नगरसेवकांकडून प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांची यादी मागितली असून, ही यादी 5 सप्टेंबरपर्यंत पक्षाच्या नेत्यांकडे द्यायची आहे. नुकत्याच पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विशेष कार्यक्रमच हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत मावळ व शिरूर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मावळमधून सद्या शिवसेनेतर्फे श्रीरंग बारणे हे लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचेच खासदार आहेत. तर भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप हे मावळमधून इच्छूक असून, त्यासाठी त्यांना तयारी करण्याचे निर्देशही पक्षपातळीवरून देण्यात आले आहेत. तर भोसरीचे आ. महेशदादा लांडगे यांना शिरूरमधून मैदानात उतरविले जाणार आहे. त्यादृष्टीने आ. लांडगे यांनी आपले नेटवर्क या मतदारसंघात तयार करण्यास सुरुवात केली आहे. 2019च्या निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्ते व नेत्यांनी आतापासून तयारी करण्याची सूचनाही प्रदेश पातळीवरील नेतृत्वाकडून देण्यात आलेली आहे.
खा. बारणे, खा. आढळरावांचे धाबे दणाणले!
शुक्रवारी आ. लक्ष्मण जगताप व आ. महेशदादा लांडगे यांनी महापालिकेतील नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत 1300 बूथवर प्रत्येकी दहा कार्यकर्ते तयार करण्याची सूचना या नेत्यांनी नगरसेवकांना केली, अशी माहिती पक्षसूत्राने दिली. वन बूथ, टेन यूथ अशी रणनीती सद्या पक्षाने आखली असून, बूथअंतर्गत येणार्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सांगण्यात आले. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने आणलेल्या योजना व त्यांचा लाभ मतदारांना मिळवून देण्यासाठी नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या असून, त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवकांनी आपल्या अडचणीही या नेत्यांना सांगितल्या. महापालिकेत सत्ता असूनही मरगळ आल्याने ती दूर करण्यासाठी या नेत्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासनही यावेळी दिले. मावळ व शिरूर मतदारसंघावर स्थानिक नेतृत्वाने लक्ष केंद्रीत केल्याने खा. बारणे व खा. आढळराव यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या मतदारसंघात मोदी लाट कायम असून, त्याची चुणूक वेळोवेळी येत आहे.