खा. अनिल शिरोळे, आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे यांच्याशी द्यावी लागणार झुंज
पुणे/पिंपरी-चिंचवड : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा एल्गार काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे करताच, पक्ष लगेच कामाला लागला आहे. शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख तथा पक्षनेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांची बैठक घेऊन निवडणूक तयारीला लागण्याच्या सूचना केल्यात. पुणेसह मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा असून, पैकी मावळ व शिरुरमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. तर पुण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांना मावळमधून तर भोसरीचे आ. महेश लांडगे यांना शिरुर मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची तयारी भाजपने केली आहे. तर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याविरोधात तेवढाच तगडा व मराठा उमेदवार देण्यासाठी शिवसेनेने ऱणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघात शिवसेनेचा खरा ‘सामना’ हा भाजपशीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना स्वबळावर लढल्यास दिडशेचा आकडा गाठू : खा. राऊत
शिवसेनेचे पक्षनेते तथा संपर्कप्रमुख खा. संजय राऊत यांनी दिवसभर पिंपरी-चिंचवड शहरात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांना ते भेटले व आगामी निवडणुकीबाबत सूचना केल्या. शिवसेनेच्या शहराध्यक्षपदी योगेश बाबर यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यातून काही वादही निर्माण झाला होता. या वादावरही त्यांनी पडदा पाडत निवडणुकीच्या अनुषंगाने काम करा, असा सल्ला दिला. महापालिकेत पक्षाचे संख्याबळ निम्म्यावर आले आहे. त्यामुळे पक्षाचा शहरात दरारा कमी झाला आहे, याबाबत खा. राऊत यांनी चिंता व्यक्त केली. काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली होती. याबाबत खा. राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी भाजपला जोरदार कानपिचक्या दिल्या. एकतर युती तोडण्याचे पाप भाजपनेच चार वर्षांपूर्वी केले आहे. तेव्हा मोदी लाट असतानाही शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवून 63 आमदार निवडून आणले. त्यामुळे 2019 मध्ये शिवसेना स्वबळावर लढल्यास हा आकडा 150च्यावर जाण्याची भीती भाजपला वाटत असून, या भीतीतूनच अशी विधाने केली जात आहे, असे टीकास्त्रही खा. राऊत यांनी डागले.
पुण्यात भाजपला शिवसेनेचेच आव्हान राहणार!
दरम्यान, शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना पहिल्यांदाच उतरणार आहे. 2014 मध्ये मोदी लाट असताना खा. अनिल शिरोळे यांनी सव्वातीन लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळविला होता. या निवडणुकीत शिवसेना ही भाजपसोबत होती. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर शिवसेनेने पक्षपातळीवर अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. तसेच, शहरात संघटना बळकट केली आहे. खा. संजय राऊत यांच्याकडे पुण्याची जबाबदारी असून, स्वतः आदित्य ठाकरे यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत खा. शिरोळे यांच्यासमोर शिवसेना उमेदवाराचेच प्रमुख आव्हान राहणार आहे. शिवाय, मावळ, शिरुर या लोकसभा मतदारसंघातही भाजपचे शिवसेना खासदारांसमोर प्रमुख आव्हान राहणार आहे. शिरुरसाठी भोसरीचे आ. महेश लांडगे यांनी आतापासून दंड थोपाटले असून, मावळमध्ये आ. लक्ष्मण जगताप यांना उतरविले जाणार आहे. खा. श्रीरंग बारणे यांना पक्षांतर्गत मतभेदाचा फटकाही बसण्याची शक्यता पाहाता, या मतदारसंघात भाजपशी लढत सोपी राहिलेली नाही.
भाजपला राज्यात असलेला पाठिंबा शिवसेना कधीही काढून घेऊ शकते. आम्ही काही भाजपला लिहून दिलेले नाही की त्यांनी पाच वर्षे कारभार करावा. ज्यावेळी आम्हाला वाटेल की हे सरकार जनतेचे राहिलेच नाही, त्यावेळी आम्ही सत्तेतून बाहेर पडू.
– सुभाष देसाई, शिवसेना नेते