माविमच्या वार्षिक बैठकीत ‘स्टेपअप’चा मासिक पाळीचा जागर

0

यावलसह रावेर, सावदा व चोपड्यात जनजागृती ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ- मासिक पाळी… स्त्रीला दिलेले वरदानच मात्र पूर्वापार पारंपरीक चालत आलेल्या पद्धत्तीमुळे घरात फारशी बोलण्याची सोय नाही त्यातच शिक्षणाचा अभाव व घरात बोलायचे तरी कुणाशी अशाच काहीशा वातावरणात जगणार्‍या महिलांसह मुलींसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ‘स्टेपअप’ने जळगाव विभागातील यावलसह, रावेर, सावदा, चोपड्यात महिलांसाठी जनजागृती शिबिर घेवून महिलांना बोलते केले. मुलींसह महिलांच्या मनातील अनेक शंका-कुशंकांना स्टेपअप इंडिया फाउंडेशनच्या समन्वयक रसिका जानराव यांनी समाधानकारक उत्तरेही दिली. यावेळी मार्गदर्शन करताना रसिका म्हणाल्या की, पाळी ही सामान्य शारीरीक घटना असली तरी पाळीच्या संबंधात महिलांसह मुलींच्या अनेक तक्रारी असतात मात्र योग्य सल्ला व उपचार मिळत नसल्याने अनेकदा अनेक आजारांना बळीदेखील पडावे लागते मात्र याबाबत भीती न बाळगता त्याविषयक मार्गदर्शकाची भूमिका आईने बजवायला हवी, असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले.

लोकसंचलित साधन केंद्रात मार्गदर्शन
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत माविमचे रीजनल मॅनेजर संदीप मराठे आणि ‘स्टेपअप इंडिया’चे संस्थापक यती राऊत व सहसंस्थापक स्वप्नीलकुमार शिरसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टेपअप’ने यावल, रावेरसह सावदा व चोपडा शहरातील लोकसंचलित साधन केंद्रात महिलांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात फाऊंडेशनच्या समन्वयक रसिका जानराव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मासिक पाळीचं चक्र हे महिलेला दिलेले वरदान असून त्यास आज अपवित्र, अशुद्ध मानले जाते. मासिक पाळीमध्ये आपली स्वच्छता राखण्यासंदर्भात प्रत्येकाने जागरूक असायला हवे. मासिक धर्म हा अतिशय नाजूक विषय असून या विषयावर समाजात अजूनही बर्‍याच ठिकाणी बोलता येत नाही किंवा साधी चर्चाही होत नाही परंतु नवीन युगातील महिलेने शिकण्याबरोबरच सर्वच बाबतीत पुढे जात असतांना चुल आणि मुल सांभाळून स्वतःची ही काळजी अगदी व्यवस्थितपणे घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

‘जैविक नॅपकिन्स’चा वापर करण्याचे आवाहन
मार्गदर्शनात रसिका जानराव म्हणाल्या की, मासिक पाळीमध्ये आपली स्वच्छता राखतांना निर्जंतूक असलेले व नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या जैविक नॅपकिन्सचा वापर करायला हवा यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगत महिलांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देत त्यांच्या शंका-कुशंकांचे निरसन केले. कार्यक्रमप्रसंगी माविम जळगांव जिल्हा समनव्यक अधिकारी अतीक शेख, सह जिल्हा समन्वयक अधिकारी उल्हास पाटील, जिल्हा सनियंत्रण अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन चोपड्याचे सलिम तडवी, सावद्याच्या छाया पाटील, जळगावच्या जयश्री पाटील, रावेरच्या मीना तडवी, यावलचे रवींद्र पाटील यांनी केले.